कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस संघाने खंडोबा तालीम मंडळ (अ) चा ३-० असा, तर दिलबहार तालीम मंडळ (अ) ने प्रॅक्टिस (ब) चा ५-० असा धुव्वा उडवत महाकाली चषक फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली.शाहू स्टेडियम येथे बुधवारी कोल्हापूर पोलीस व खंडोबा (अ) यांच्यात सामना झाला. प्रारंभापासून पोलीस संघाकडून सोमनाथ लांबोरे, विशाल चौगले, शुभम संकपाळ, निखिल साळोखे, युक्ती ठोंबरे यांनी खोलवर चढाया केल्या. २५ व्या मिनिटांस पोलीस संघाच्या युक्ती ठोंबरेने मिळालेल्या कॉर्नर किकवर गोल करत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. एका गोलने पिछाडीवर असलेल्या खंडोबा संघाकडून श्रीधर परब, सागर पोवार, सचिन बारामते, शकील पाटील यांनी सामन्यात बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस संघाच्या जोरदार खेळापुढे त्यांचे काहीच चालले नाही. उत्तरार्धात ५९ व्या मिनिटास पोलीस संघाच्या अमोल चौगलेने मैदानी गोल करत आघाडी २-० ने वाढविली. ६५ व्या मिनिटास शकिल पटेलद्वारे स्वयंगोल झाला. त्यामुळे पोलीस संघास ३-० अशी आघाडी मिळाली. हीच आघाडी शेवटपर्यंत अबाधित राहिल्याने सामना पोलीस संघाने ३-० असा जिंकला. दिलबहार (अ) व प्रॅक्टिस (ब) यांच्यात झालेल्या दुसरा सामना दिलबहार (अ) ने ५-० अशा गोल फरकाने जिंकला. सामन्याच्या प्रारंभापासून दिलबहार (अ) च्या सनी सणगर, जावेद जमादार, सचिन पाटील, करण चव्हाण-बंदरे यांनी खोलवर चढाया केल्या. २० व्या मिनिटास सनी सणगरने पहिला गोल नोंदवला व आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. २४ व्या मिनिटास सचिन पाटीलने मैदानी गोल करीत आघाडी २-० अशी वाढवली. उत्तरार्धात ५८ व्या मिनिटास सनी सणगरने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवला. प्रॅक्टिस (ब)कडून अनिकेत जोशी, केदार पसारे यांनी चांगला खेळ केला. मात्र, दिलबहार(अ)च्या धडाकेबाज खेळापुढे त्यांचे काहीच चालले नाही. ६८ व्या व ७९ व्या मिनिटास करण चव्हाण याने दोन गोल नोंदवत आघाडी ५-० अशी आपल्या संघास मिळवून दिली. अखेरपर्यंत दिलबहार(अ)चेच वर्चस्व राहिल्याने सामना ५-० असा दिलबहार(अ) ने एकतर्फी जिंकत पुढील फेरी गाठली. प्रवेशावरून वादावादी स्टेडियममध्ये विनातिकीट प्रवेश करणारे तरुण व संयोजक यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे काहीकाळ प्रेक्षक गॅलरीत तणाव निर्माण झाला होता. मात्र, काही वेळाने हा तणाव निवळला.‘ई’ गटासाठी मोठी गर्दीकेएसए ‘ई ’ गटातील फुटबॉलपटूंची नोंदणी करण्यासाठी केएसए कार्यालयाबाहेर खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कार्यालयाचा परिसर नवोदित खेळाडूंच्या गर्दीने फुलून गेला होता.
पोलीस, दिलबहार (अ) विजयी
By admin | Published: March 04, 2015 11:27 PM