कोल्हापूर : कडक लॉकडाऊनमध्ये पोलिसांची बंदोबस्ताची ड्यूटी तब्बल १२ तासांची अशी दोन शिफ्टमध्ये होती, सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर पोलिसांची ड्यूटी ही आठ तासांची अशी दोन शिफ्टमध्ये करण्यात आली आहे. बंदोबस्तातील बदलामुळे पोलिसांना आता काही अंशी उसंती मिळणार आहे. दरम्यान, सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत शिथिलता आणली असली तरीही या कालावधीत पोलीस बंदोबस्त व कडक कारवाई सुरुच राहणार आहे.
गेल्या आठवडाभर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनमध्ये पोलिसांचाही कडक बंदोबस्त होता, या कालावधीत पोलिसांची ड्यूटी १२ तासांची करण्यात आली होती. पण सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तात बदल करण्यात आला. आता पोलिसांना तीन शिफ्टमध्ये आठ तासाची ड्यूटी लावण्यात आली आहे. त्याशिवाय कडक बंदोबस्तावरील कर्मचारी कमी करून ती इतर ठिकाणी विभागणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली असली तरीही सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. त्याशिवाय दिवसभर गल्लीबोळात पोलिसांची फिरती गस्ती पथके वाहनातून नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.
काही नाकाबंदी पॉईंटमध्येही बदल
जिल्ह्यात अगर शहरात प्रवेशणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांची नाकाबंदी कायम ठेवून इतर अंतर्गत नाकाबंदीची काही ठिकाणे बदलण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता नेहमीपेक्षा इतर मार्गावरही पोलीसांची नाकाबंदी राहून अचानक वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.
कोट..
कडक लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी चांगले कर्तव्य बजावले आहे. आता बंदोबस्तात थोडा बदल केला असला तरीही पोलिसांची कडक कारवाई ही सुरूच राहणार आहे. तर पोलिसांची इतर कामासाठीही विभागणी केली आहे. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.