एकनाथ पाटील, कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा पोलीस दल अहोरात्र प्रयत्न करीत आहे; परंतु गणरायाच्या आगमनादिवशीच काही तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीच्या ठेक्यावर जल्लोष करीत गणरायाचे स्वागत केले. डॉल्बीच्या दणदणाटाचा घरातील लोकांना त्रास होऊ लागल्याने एका महिलेने करवीर पोलिसांना डॉल्बी बंद करण्याची फोनवरून विनंती केली. त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या ठाणे अंमलदाराने ‘मॅडम, आज त्यांचा दिवस आहे, डॉल्बी लावणारच ते..!’ असे म्हणून फोन ठेवला. डॉल्बीमुक्तीचे आवाहन करणारे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या उपक्रमाला त्यांचेच पोलीस कर्मचारी पायदळी तुडवीत असल्याचे विदारक चित्र काल, शहरवासीयांनी अनुभवले. गणरायाच्या स्वागतासाठी लावलेले डॉल्बी निरोपाच्या वेळी पोलीस रोखणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार सार्वजनिक तरुण मंडळांच्या बैठका घेतल्या. गणराया अवॉर्ड कार्यक्रमातही पोलिसांनी आवाहन केले. शहरात ठिकठिकाणी डॉल्बीच्या मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल प्रबोधनपर पोस्टर्स लावली. सर्व स्तरांवर प्रबोधन करूनही काही तरुण मंडळांनी पोलिसांचे आवाहन झिडकारून डॉल्बी लावण्याचा पवित्रा घेत गणरायाच्या आगमनादिवशीचं डॉल्बीची झलक दाखवून दिली. काल रस्त्यावर उतरलेल्या तसेच घरामध्ये विश्रांती घेणाऱ्या लोकांना या डॉल्बीच्या दणदणाटाचा त्रास सहन करावा लागला. घरगुती गणपती घरी घेऊन जाण्यासाठी वृद्ध नागरिक, लहान मुले, स्त्रिया रस्त्यावर उतरल्या होत्या. जोरजोरात ध्वनिक्षेपक लावून जल्लोष सुरू केल्याने गर्भवती स्त्रियांसह अनेक वृद्ध लोकांना रक्तदाब, हृदयरोग, अर्धांगवायू यासारख्या त्रासांना तोंड द्यावे लागले. साने गुरुजी वसाहतीमध्ये काल, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका तरुण मंडळाचा डॉल्बीचा ठेक्याने नागरिकांच्या घरांच्या भिंती थरथरल्या कारवाई शून्य डॉल्बीबाबत कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केली होती. काल, शुक्रवारी गणरायाच्या आगमनादिवशी शहरात डॉल्बी वाजले. हे पोलिसांनीदेखील पाहिले; परंतु अद्याप एकावरही कारवाई झालेली नाही. राजकीय दबाब आगामी विधानसभा निवडणुकांमुळे गणेशोत्सवात तरुण मंडळांना डॉल्बी लावण्यापासून रोखू नये, त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची पोलीस दलाने काळजी घ्यावी, असा राजकीय दबाब पोलिसांवर आहे. त्यामुळे पोलिसांनी काल, शुक्रवारी डॉल्बीवर कारवाई करण्यास दोन पावले मागे घेतल्याची चर्चा आहे.
पोलिसांकडूनच डॉल्बीला प्रोत्साहन
By admin | Published: August 31, 2014 12:17 AM