कोल्हापूर: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून प्रसंगी कायद्याचा दंडुका हातात घेत पोलिसांचा तपासणी नाक्यावर रात्रदिवस बंदोबस्त लावण्यात आला आहे, पण या कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोईचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. विशेषत: बंदोबस्तात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची कुचंबना होत असून त्यांना आजूबाजूच्या घरामध्ये विचारणा करत फिरावे लागत आहे, अन्यथा जवळचे पोलीस ठाणे गाठावे लागत आहे.
लॉकडाऊन लावला, निर्बंध कडक केले, दंडाची रक्कम वाढवली तरी नागरिकांचे बाहेर फिरणे काही कमी होत नसल्याने अखेर नाक्यानाक्यावर पोलिसांचा फौजफाटाच तैनात ठेवण्यात आला आहे. एकेका नाक्यावर किमान १० ते १५ पोलीस रात्रंदिवस येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला बारा-बारा तासाची ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यांना जेवणाची सोय मुख्यालयाकडून होत आहे, पण नाक्याच्या परिसरात सार्वजनिक मुतारी अथवा शौचालये नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे.
आजूबाजूची सरकारी, खासगी कार्यालये, हॉटेल यांनी माणुसकीच्या नात्याने वापरावयास देत आहेत, पण तेही सकाळी ७ ते ११ या वेळेपर्यंत त्यानंतर दिवसभर आणि रात्र जायचे कुठे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. काही जण जवळच्या पोलीस ठाण्यांचा आधार घेत आहेत, तर काही जण आजूबाजूच्या घरामध्ये विचारपूस करून सेवा वापरत आहेत. शाहू नाका, सरनोबतवाडी, सायबरसह शहरातील सर्वच नाक्यावर कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी तर फारच पंचाईत होते. अन्य वेळी निदान आजूबाजूची स्वच्छतागृहे काही काळ तरी वापरावयास मिळतात.
नाक्यावर बसायला प्लास्टिकच्या खुर्च्या आहेत, रात्रदेखील अशीच उघड्यावर काढावी लागते. एकूणच नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून या पोलिसांना मात्र रस्त्यावरच्या या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. नागरिकांना याचे तरी भान आता यायलाच हवे, फारच अत्यावश्यक व मेडिकल इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडावे अन्यथा घरात राहून पोलीस यंत्रणेवरील ताण हलका करण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे.