जयसिंगपूर / कुरुंदवाड : जयसिंगपूर व कुरुंदवाडमध्ये बॉम्बसदृश वस्तू ठेवून अज्ञाताने पोलीस यंत्रणेला वेठीस धरले होते. या घटनेला दोन आठवडे उलटूनही या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. या दोन्ही घटनांमध्ये साम्य आढळून आले आहे. शिवाय, त्याचे सांगली कनेक्शन असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोलिसांनी आपली प्रतिमा उंचावण्याची गरज आहे.
जयसिंगपूर येथील पायोस हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. बॉम्बशोधक व नाशक पथकाने संपूर्ण तपासणी केल्यानंतर, तो बॉम्ब नसल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, अशाप्रकारचे कृत्य कोणी केले, याचा शोध सुरू असतानाच, कुरुंदवाडमध्येही बनावट बॉम्बसदृश वस्तू पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सांगलीतील एका व्यक्तीने बॉम्बसदृश वस्तू ठेवून शिवसेनेच्या शहर प्रमुखांना गिफ्ट दिल्याचे सांगून जाणाऱ्या संशयिताला हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कुरुंदवाडमध्ये वस्तू घेऊन येणारी व्यक्ती सांगलीची असल्याने दोन्ही घटनेचे कनेक्शन एकच, यानुसार सांगलीतील सीसीटीव्ही फुटेजवरून प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस पथक नियुक्त करण्यात आले होते. अद्याप याचा तपास लागलेला नाही.
समाजात अशाप्रकारे भीती निर्माण करणाऱ्या संशयितांना पकडून पोलिसांनी आपली प्रतिमा उंचावण्याची गरज आहे. घटनेबाबत जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे व कुरुंदवाडचे चंद्रकांत निरावडे यांनी तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले.