एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूर खुद्द पोलिसांकडूनच ‘देशसेवे’ऐवजी ‘स्वयंसेवा’ होत असल्याचा आरोप चक्क मटकेवाल्यानेच केल्याने पोलीस प्रशासनाच्या अबू्रचे धिंडवडे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. मटका बुकीचालक विजय पाटील याने थेट पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासमोर पोलिसांचा दुसर्यांदा पंचनामा केल्याने त्याच्याकडून हात ओले झालेल्या पोलिसांची ‘हवा टाईट’ झाली आहे. विजयसारखेच आणखी पाच ते सहा मटका बुकीमालक खुलेआम मटका-जुगार चालवीत आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त असल्याने पोलिसांनी आजपर्यंत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलेला नाही. त्यामुळेच विजय याने आगपीट होऊन शर्मा यांच्याकडे तक्रार केली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी यापूर्वी त्याच्या अर्जाला केराची टोपली दाखविली होती. आता मात्र डॉ. शर्मा त्याच अर्जाची खोलवर चौकशी करणार असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. राजारामपुरीत साडेतीन वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या दरम्यान विजयला चक्क पोलीस कॉन्स्टेबल फिरोज मुल्ला दुचाकीवरून घेऊन आला, हे सर्व नागरिकांनी पाहिले आणि ते अवाक्ही झाले. गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी करवीर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कॉन्स्टेबल आपल्याकडून कसा हप्ता घेतात, याचे चित्रीकरण विजयनेच माध्यमांसमोर सादर केले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्या कारकिर्दीत पुन्हा विजयने १७२ पोलीस मटक्यातून कसे हप्ते घेतात, याचा माध्यमांसमोरच पंचनामा केला होता. त्यावेळी ‘शहरात मटका अड्डे चालवून गुन्हेगारी कृत्ये करणार्या व्यक्तीने केलेल्या आरोपांना व कुणाला पैसे दिले याची यादी जाहीर करण्याला विचारतो कोण? त्याची दखल घ्यायची पोलीस खात्याला गरज नाही. एका गुन्हेगाराच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचे?’ असे म्हणून ‘मटक्यातून पोलीस कसे हप्ते घेतात, याचा उलगडा पाटील याला करायचा होता, तर त्याने लाचलुचपत विभागाकडे का तक्रार केली नाही? थेट प्रसारमाध्यमांकडे यादी देऊन आपण साव असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केल्या’चे पोलीस अधीक्षक जाधव यांनी स्पष्ट करून, त्याच्या आरोपांना कारवाई तर सोडाच, उलट ‘केराची टोपली’ दाखविण्यात आल्याचे स्पष्ट केले. शहरात मटका अड्डे चालविणारे आणखी काही दिग्गज आहेत. राजकीय वरदहस्तामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाईचे हत्यार न उपसता त्यांच्या जागी पंटर दाखवून कारवाईचा दिखावा करतात. शहरात जुना राजवाडा, शाहूपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या दिग्गजांचा खुलेआम आजही मटका-जुगार सुरू आहे. त्यांची नावे विजयने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे दिली आहेत. एक मटकावाला तक्रार करतो, त्यामुळे त्याच्यावर आतापर्यंत कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. डॉ. शर्मा यांनी मात्र त्याच्या अर्जाची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांनी विजय याच्यावर आतापर्यंत शेकडोंच्या वर गुन्हे दाखल असल्याचे रेकॉर्ड शर्मा यांना दाखवून आपली बाजू चोख असल्याचा कांगावा केला आहे. मटका व्यवसायात भागीदारी असती तर विजय डॉ. शर्मा यांच्यासमोर आला नसता. त्याने आपण सर्व अवैध धंदे बंद केले असतानाही आपल्यावर हद्दपारीची नोटीस जारी होते. पोलिसांकडून आपणास लक्ष्य केले जात आहे, असे म्हटले आहे. त्याच्या तक्रारीत काहीतरी तथ्य असण्याची शक्यता आहे. शर्मा यांनी त्याच्या अर्जाची खोलवर चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये त्यांनी स्वत: लक्ष घातल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची दाट शक्यता आहे.
विजयच्या तक्रारीने पोलिसांची ‘हवा टाईट’ केराच्या टोपलीतील अर्ज पुन्हा टेबलावर ; मटकेवाल्याकडून पोलिसांचा दुसर्यांदा पंचनामा
By admin | Published: May 11, 2014 12:34 AM