कोल्हापूर : खंडणी, अपहरणासारख्या गंभीर गुन्हात हव्या असलेल्या रेकॉर्डवरील फरार गुन्हेगारास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत आरोपी विजय उर्फ काळबा रामभाउ गायकवाड (वय ४२, रा. टेंबलाई फाटक, कोल्हापूर) याच्या तोंडात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
सीपीआर रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.विजय उर्फ काळबा गायकवाड याच्यावर खंडणी, लहान मुलांच्या अपहरणाचे चार गंभीर गुन्हे गांधीनगर पोलिसांत दाखल आहेत. याप्रकरणात तो फरारी होता. त्याच्यावर आणखी १२ गुन्हे दाखल आहेत.
गुरुवारी गायकवाड महाडिक माळ परिसरातील तारा आईल मिलजवळील आपल्या सासरवाडीत सासऱ्याच्या वर्षश्राध्दासाठी येणार असल्याची टीप राजारामपुरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या परिसरात सापळा रचला होता.
सायंकाळी पत्नी आणि मुलासह काळबा तेथे येताच पोलिसांच्या तीन तुकड्या तेथील तीन घरात घुसल्या. त्यातील एका घरातून काळबाला पोलिसांनी ओढत बाहेर आणले. यादरम्यान पोलिसांसोबत त्याची झटापट झाली.
काळबाने त्याच्याजवळील शस्त्र पोलिसांवर रोखले, याचदरम्यान एका पोलिस कॉन्स्टेबलने मागच्या बाजूने त्याच्या अंगावर उडी घेतली. या घडामोडीत त्याच्याजवळील शस्त्रातून निघालेली गोळी त्याच्याच तोंडात घुसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ कोल्हापूरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, कोल्हापूरचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी सीपीआर परिसरात धाव घेतली. डॉक्टरांनी काळबावर शस्त्रक्रिया केली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देशमुख यांनी पत्रकारांना दिली.
दरम्यान, काळबाची पत्नी अश्विनी आणि सिध्दार्थ यांनी पोलिसांनी घरात घुसून गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. महिलांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण महिलांशी झटापट करुन बाजूला केल्याचा आरोप त्यांनी सीपीआर परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.सीपीआर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त असून तेथे प्रचंड गर्दी आहे. महाडिक माळ परिसरातही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.