कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या उद्या, सोमवारी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात सर्वत्र कडेकोट सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी मतमोजणी परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शनिवारी दिली. दरम्यान, मतमोजणी मार्गांवर बंदोबस्तात असलेली पोलीस वाहने, अग्निशामक दल, शासकीय वाहने, रुग्णवाहिका, तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली पासधारक वाहने वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. उद्या पहाटे पाचपासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली असल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. वळविण्यात आलेले मार्ग राष्ट्रीय महामार्गावरून शाहू जकात नाक्यामार्गे शहराकडे जाणारी सर्व प्रकारची मोटार वाहने ही राष्ट्रीय महामार्ग उचगाव, तावडे हॉटेलमार्गे मार्गस्थ होतील. शहरातून सायबर चौकमार्गे शाहू जकात नाक्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने सायबर चौक, एस. एस. सी. बोर्ड, राजेंद्रनगरमार्गे शाहू जकात नाक्याकडे जातील. इंदिरासागर हॉल (संभाजीनगर)कडून सायबर चौकामार्गे महामार्गाकडे जाणारी सर्व वाहने ध्यानचंद हॉकी स्टेडियम, शेंडा पार्क, आर. के. नगर, शांतिनिकेतन विद्यालयमार्गे शाहू जकात नाक्याकडे जातील. राजारामपुरी परिसरातून ताराराणी चौकाकडे ये-जा करण्यासाठी वाहनचालकांनी टाकाळा चौक, रेल्वे फाटकमार्गे अवलंब करावा. सरनोबतवाडी जकात नाकामार्गे शहरात येणाऱ्या वाहनांनी उचगाव, तावडे हॉटेलमार्गे मार्गस्थ व्हावे. ताराराणी चौकाकडून रेल्वे उड्डाणपूलमार्गे महामार्गाकडे जाणारी सर्व वाहने लिशा हॉटेल सिग्नल चौक, मुक्त सैनिक वसाहत, शिरोली जकात नाका, तावडे हॉटेलमार्गे जातील. (प्रतिनिधी)
मतमोजणीसाठी पोलीसदल सज्ज
By admin | Published: November 01, 2015 1:07 AM