कोल्हापूर : पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. त्यामुळे बहुतांश पोलिसांना हृदयविकार, मधुमेह, पोटविकार, सांधेदुखी, आदी आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील १८ हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ‘हेल्थ चेकअप’ केले जाणार आहे. पोलिस शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहिले तरच ते चोवीस तास काम करू शकतात. त्यामुळे त्यांना रोज सकाळी व्यायामाबरोबर पाच किलोमीटर धावण्यासाठी सक्ती केली जाणार आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. नांगरे-पाटील म्हणाले, नागरिकांची सुरक्षा सांभाळणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्रातील १८ हजारपैकी तब्बल ४० टक्के पोलिस अधिकारी व कर्मचारी शारीरिकदृष्ट्या ‘अन्फिट’ असल्याचे समोर आले आहे. रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखीसह मानसिक असंतुलनाचे ते शिकार बनले आहेत. व्यायामाच्या अभावामुळे पोलिसांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. पोलिस खात्यात भरती होताना उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाते. ज्यांची ही क्षमता चांगली आहे, त्यांनाच खात्यामध्ये प्रवेश मिळतो; परंतु खात्यामध्ये भरती झाल्यावर शरीर सुदृढ ठेवण्याकडे दुर्लक्ष होते. पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे हे चुकीचे आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याचा अधिकारी शारीरिकदृष्ट्या फिट असेल तर कर्मचारीही फिट राहतात. व्यायामाचा अभावामुळे अनेक अधिकाऱ्यांची शरीराची रचना अनफिट झाली आहे. रोज व्यायामाची सवय असणाऱ्यांना दिवसभर ताण किंवा शारीरिक त्रास जाणवत नाही. परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्णांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहमी शारीरिकदृष्ट्या फिट राहावे, यासाठी त्यांना रोज पाच किलोमीटर धावण्याची सक्ती केली जाईल. प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यावर माझे पथक लक्ष ठेवून असेल. घरांचा प्रश्न मार्गी लावणार परिक्षेत्रात पोलिसांसाठी २ हजार ७०० निवासस्थाने प्रस्तावित आहेत. त्यामध्ये कोल्हापूर एक हजार, सांगली ६००, पुणे ग्रामीण ५०० आदींचा समावेश आहे. सातारा येथील ६९० घरांना गृहविभागाने मंजुरी दिली आहे. या सर्व निवासस्थांनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
पोलिसांना पाच किलोमीटर धावण्याची सक्ती
By admin | Published: August 14, 2016 12:37 AM