राम मगदूम ।गडहिंग्लज : मुत्नाळमधील अवैध धंद्याच्या बंदोबस्ताचा ठराव गावसभेत एकमताने मंजूर झाला. त्याच्या अंमलबजावणीची सर्वस्वी जबाबदारी आता पोलिसांवर आहे. मात्र, त्यासाठी गावात पोलीस मित्रांची नेमणूक करून त्यांच्यावरच ही ‘कामगिरी’ सोपविण्याचा इरादा पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी त्याच गावसभेत जाहीर केला. म्हणजेच ‘तुमच्या गावातील अवैध धंद्याचा बंदोबस्त तुम्हीच करा’ असा अप्रत्यक्ष सल्ला देत त्यांनी आपली बंदूक गावकºयांच्या खांद्यावरच ठेवली आहे.
संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावरील हिटणी नाक्यापासून हिटणी व मुत्नाळ या गावांची हद्द सुरू होते. अवैध धंदे चालकांनी काही वर्षापासून याठिकाणी आपले हात-पाय पसरले आहेत. त्यातून निर्माण झालेल्या हितसंबंधामुळेच बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील ‘शिनोळी’प्रमाणेच हिटणी नाक्यावरील दारू, मटका, जुगार आदी अवैधधंदे तेजीत आल्यानेच त्यातील ‘हितसंबंध’ अधिक घट्ट होत गेले. त्यामुळेच त्याला आव्हान देणे अवघड होते. परंतु, निडसोशी मठाचे मठाधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनीच त्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने त्यांचा ‘शब्द’ प्रमाण मानणारे मुत्नाळकर पुढे सरसावले आहेत. किंबहुना, त्यासाठीच सरपंचांना ही गावसभा बोलवावी लागली.
यावेळी उपस्थित राहिलेले पोलीस निरीक्षक हसबनीस यांनी ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची ग्वाही जाहीरपणे दिली. मात्र, त्यासाठी गावात २० पोलीस मित्रांची नेमणूक करून त्यांना बॅचीस, काठी व टॉर्च दिला जाईल. त्यांनी गावात पोलिसांची भूमिका बजावावी. गावच्या निर्णयानंतरदेखील शिरजोरी करून कुणी अवैध धंदे सुरू केले, तर त्यांना पकडून ठेवा, त्यांच्यावर ‘आम्ही’ नियमाप्रमाणे कारवाई करू. मुत्नाळमधील हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो गडहिंग्लज तालुक्यातील अन्य गावातही राबविली जाईल, अशी ग्वाही दिली. परंतु त्यांच्या सल्ल्याने ग्रामस्थ बुचकळ्यात पडले आहेत.अवैध धंदे का वाढले !हिटणी नाका परिसरातील जमीन माळरान आहे. परंतु, सीमेवरील शेतात एखादी टपरी, शेड घालायला केवळ मोकळी जागा भाड्याने दिली तरी चांगले पैसे मिळायला लागले. त्यामुळेच या ठिकाणी बेकायदेशीर ‘उद्योगां’ना निवारा मिळू लागला. सध्या येथील ‘धंदे’ बंद असले तरी ते निवारे अजूनही उपलब्ध आहेत. म्हणूनच ते जमीनदोस्त करण्याची मागणी आहे.सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस जबाबदार२०१३ मध्ये महिलांच्या मतदानाने मुत्नाळमधील सरकारमान्य दारू दुकान बंद झाले आहे. मटका-जुगारीला शासनाची मान्यताच नाही. त्यामुळे गावसभेच्या निर्णयानंतरदेखील अवैध धंदे सुरूच राहून गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आल्यास त्याची जबाबदारी पोलिसांवर राहील, असा ठराव करून ग्रामस्थांनी पोलिसांवरच ‘निशाणा’ ठेवला आहे.स्वामीजी का संतापले !दोन दशकांपासून ज्ञानदासोहाच्या माध्यमातून मुत्नाळ गावच्या सामाजिक सुधारणेसाठी महास्वामीजी प्रयत्नशील आहेत. असे असतानाही गावात अवैध धंदे वाढतच राहिले. त्यात काही गावपुढाºयांचाही ‘इंटरेस्ट’ असल्याचे समजल्यामुळेच स्वामीजी संतापले. त्यामुळेच त्यांनी आधी गावातील अवैध धंदे बंद करा. मगच ‘दासोह’ करू, अशी भूमिका घेतली. त्यामुळेच ग्रामस्थांबरोबरच पोलीसही पेचात सापडले आहेत.