- एकनाथ पाटील
कोल्हापूर - मागे कोणी नाही, दोन्ही पाय निकामे, लाकडी गाड्यावर बसून दोन वेळच्या पोटासाठी भिक्षा मागत रखरखत्या ऊन्हात शहरात फिरायचे, दोन हात हिच त्यांच्या गाड्याची चाके. गजबजलेल्या सीपीआर चौकात सिग्नल सुरु असल्याने ते बाजूच्या खडकाळ रस्त्यावरुन घसपटत निघाले. दगडामध्ये गाड्याचे चाक अडकले. गाडा पुढे सरता सरत नव्हता. घामाघुम झालेल्या दिव्यांगाला काहीच सुचत नव्हते. तो ओरडला दगडात अडकलोय ओ, हाकेच्या अंतरावर उभे असलेले वाहतुक शाखेचे सहायक फौजदार जयवंत कृष्णा गुरव यांच्या कानावर हे शब्द पडले. क्षणाचाही विचार न करता त्यांनी त्याचेकडे धाव घेतली. गाड्याची दोरी धरुन त्यांना सहीसलामत चौकातून पुढच्या रस्त्याला सोडले. चेह-यावर स्मितहाष्य आणि नमस्कार करुन दिव्यांग पुढे सरकत गेला. सहायक फौजदार गुरव यांच्या मदतीचे कोल्हापुरच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे.शहरात भवानी मंडप, गंगावेश दत्त मंदिर, आझाद चौक दत्त मंदिर, ओढ्यावरील गणपती, रंकाळा साई मंदिर परिसरात चाळीसी गाठलेले दिव्यांग भिशा मागत फिरत असतात. त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी ऊन्ह, वारा, पासून झेलत ते शहरभर आपल्या लाकडी गाड्यावरुन फिरत असतात. या गाड्याची चाके म्हणजे त्यांचे दोन हात. गाड्यावर बसून दोन्ही हातांनी गाडा पुढे ढकलत ते फिरत असतात. रखरखत्या उन्हात ते आजही शहरात फिरताना दिसतात.शनिवारी (दि. २५) सकाळी साडेदहाच्या सुमारास सीपीआर चौकात वाहनधारकांची गर्दी होती. सिग्नल सुरु होता. याठिकाणी शहर वाहतुक शाखेचे सहायक फौजदार गुरव सेवा बजावत होते. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई, हॉर्न वाजवित सुसाट वाहने जात होती. सीपीआर चौकात सिग्नल लागल्याने वाहने थांबलेली. सिग्नल कधी सुटतो याची घाई प्रत्येकाला होती. रस्त्यावर वाहने असल्याने लाकडी गाड्यावरुन टाऊन हॉलच्या दिशेने दसरा चौकाकडे जाणारा दिव्यांगाने आपला गाडा रस्त्याच्या बाजूला घेत तो पुढे येऊ लागला. करवीर पंचायत समितीच्या समोरच दगडामध्ये त्याचा गाडा अडकला. तो पुढे सरकतचं नव्हता. त्याचे प्रयत्न संपले. अंग घामाघुम झाले होते. आजूबाजूचे लोक त्याचेकडे बघत होते. परंतु मदतीला कोणीच पुढे येत नव्हते. तो ओरडला, दगडात अडकलोय ओ, हे शब्द हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरव यांच्या कानावर पडताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्याच्या गाडीला बांधलेली दोरी हातामध्ये पकडून गाडा ओढला. चौकाच्या पलिकडे रहदारीमधून त्याला सुखरुप सोडले. रस्त्यावरील नागरिक हे पाहत होते. चौकात थांबलेल्या प्रसाद गवस यांनी हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये टिपला. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलीसातील माणुसकीचा ओलावा नागरिकांना दिसून आला आणि गुरव यांचेवर कौतुकाचा वर्षाव झाला. ‘गुरव मामा’ होणार सेवानिवृत्त सहायक फौजदार जयवंत गुरव यांची ३५ वर्ष सेवा झाली. शांत, मनमिळावू असा त्यांचा स्वभाव, नागरिकांना मदत करणे हीच त्यांच्या कामाची पध्दत. ते ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. वाहतूक शाखेमध्ये ‘गुरुव मामा’ म्हणून त्यांची ओळख आहे.