इचलकरंजी : गुटखा धंद्याकडे दुर्लक्ष व कारवाई न करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेले शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव बाबूराव गायकवाड आणि पोलिस नाईक विष्णू रमेश शिंदे या दोघांना शनिवारी येथील न्यायालयासमोर उभे केले. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अप्पर व जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मर यांनी दिले. यावेळी दोघांच्यावतीने दाखल केलेल्या जामीन अर्जांवरील सुनावणी सोमवारी होणार असल्याने दोघांना दोन दिवस जेलची हवा खावी लागणार आहे. शुक्रवारी राजू पाच्छापुरे याच्याकडून ६० हजार रुपयांची लाच घेताना पोलिस नाईक विष्णू शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. तसेच पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या सांगण्यावरून ही लाच स्वीकारल्याचे तपासात समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. गायकवाड आणि शिंदे या दोघांना शनिवारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात येथील जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. तर यावेळी सादर केलेल्या दोघांच्या जामीन अर्जांवर न्यायालयाने सोमवारी (दि. २६) निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. यामुळे गायकवाड आणि शिंदे यांची जेलला रवानगी करण्यात आली आहे. (वार्ताहर) नामचीन गुंडासह अवैध व्यावसायिकांची आवारात गर्दी ४शिंदे याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने शहरासह बाहेरच्याही काही नामचीन गुंडांसह अवैध व्यावसायिकांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती. ४यावेळी न्यायालयात जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह नागरिकांना समर्थक व पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. बडदास्त पाहून एकाने विचारला जाब लाच प्रकरणात सापडलेल्या पोलिसांना मिळणारी बडदास्त पाहून एका नागरिकाने याचा जाब पोलिस निरिक्षक मनोहर रानमाळे यांना विचारला. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई असल्याने आमचा संबंध येत नाही, असे सांगत त्यांनी जबाबदारी झटकली. तर त्यावेळी त्या नागरिकाचा आवाज बंद करण्यासाठी काहींनी त्याला तातडीने बाजूला नेत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गर्दी केलेल्या नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू होती. शिंदेने आपले तोंड अगदी कौशल्याने लपविले न्यायालयातून शिंंदे याला परत नेताना पोलिस फौजफाटा असतानाही समर्थकांनी प्रसारमाध्यमांना त्याचे छायाचित्र मिळू नये, यासाठी त्याला गराडा घातला होता. समर्थकांच्या गराड्यातच शिंंदे याला पोलिस गाडीत घालून पाठविण्यात आले. त्यानेही आपले तोंड लपविले.
पोलिस निरीक्षकांसह दोघांना न्यायालयीन कोठडी
By admin | Published: September 25, 2016 1:13 AM