कोल्हापूर : पोलीस स्मृतिदिनानिमित्त बुधवारी पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे विशेष कार्यक्रमात शहीद जवानांना आदरांजली वाहिली. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.वर्षभरात भारतात २६४ पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. महाराष्ट्रातील एक पोलीस उपनिरीक्षक, तीन पोलीस नाईक व एक पोलीस शिपाई असे शहीद झाले. शहीद झालेल्यांना विशेष कार्यक्रमात श्रद्धांजली वािहली. पोलीस मुख्यालयातील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली.दि. २० ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान हरवले. त्यांच्या शोधासाठी आय.टी.बी.पी. आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २२ जवानांची एक तुकडी २१ ऑक्टोबरला गेली. तुकडीवर हॉट स्प्रिंग्ज येथे झालेल्या चिनी सैनिकांच्या गोळीबारात १० जवान मृत्युमुखी पडले, पाच जखमी झाले, तर सात जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले. शत्रूशी लढताना या शूर वीरांनी देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले, तेव्हापासून २१ ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.
स्मृतिदिनप्रसंगी गृह पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक पद्मा कदम, पोलीस निरीक्षक सत्यवान माशाळकर आदी उपस्थित होते. त्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पहार अर्पण करून शहीद जवानांना मानवंदना दिली.