कोल्हापूर : लॉकडाऊनचे निर्बंध कडक असूनदेखील रोज सकाळी होणारी बाजारपेठेतील गर्दी काही केल्याने हटत नाही, ही गर्दी प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे. कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या या गर्दीला पोलीस आणि महापालिका प्रशासनास बळाचा वापर करून हटवावे लागत आहेत. रोज काही पटीने वाढणारे कोरोना रुग्णांमुळे आरोग्य प्रशासन हैराण झाले असताना, जनता मात्र आपले कर्तव्य पार पाडताना दिसत नाही.कोल्हापूर जिल्ह्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती, तिची मुदत दि. १५ मे पर्यंत दुसऱ्यांदा वाढविण्यात आली. मात्र या दरम्यान रोज सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने व भाजी मंडई सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. गोकूळ दूध संघाची निवडणूक ही याच दरम्यान सुरू होती.
त्यामुळे संचारबंदी लागू करूनही काही केल्या कोरोनावर नियंत्रण मिळविता आले नाही. उलट कोरोनाचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे आता शनिवारी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केला जात आहे, या दरम्यान कोणाही व्यक्तीला आपले राहते घर सोडून रस्त्यावर येता येणार नाही.लॉकडाऊनची कुणकुण लागताच गेल्या तीन चार दिवसापासून नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करायला सुरवात केली. सकाळच्या सत्रात चार तास दुकाने उघडी राहिल्यामुळे या चार तासातच प्रचंड गर्दी होत आहे. परंतु सकाळी अकरा वाजेपर्यंत लोकांना रोखताही येत नाही. त्यामुळे होणारी गर्दी प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे. भाजीपाला, धान्य तसेच किराणा माल घेण्याकरिता नागरिक दुकानांसमोर रांगा लावत आहेत.गुरुवारी सकाळी शहरातील सर्वच रस्त्यावर, बाजारपेठेत, भाजी मंडईतून गर्दी उसळली होती. दुकानदारांनी बऱ्यापैकी सोशल डिस्टंन्स राखण्यात यश मिळविले होते, परंतु भाजी मंडईत त्याचे कोणालाच भान रहात नाही. रस्त्यावर वाहनांची गर्दी, बाजारात लोकांची गर्दी होती. सकाळी साडेअकरा वाजल्यानंतर मात्र पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सक्तीने लोकांचे बाजार उठविले.शहरात महाराणा प्रताप चौक, लुगडी ओळ येथील वडाप रिक्षा थांब्यावर अनेक रिक्षा प्रवाशांच्या प्रतीक्षेत होते. प्रवासी मिळतील तशा या रिक्षा रस्त्यावर धावताना दिसत होत्या. एकीकडे केएमटीची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली असताना दुसरीकडे रिक्षाची वडाप वाहतुक सुरू होती. पेट्रोलपंप सुरू होते.