गारगोटी -(कोल्हापूर) : गारगोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस दलाच्या जागेवरील खासगी व्यक्तीने केलेले अतिक्रमण पोलिसांनी हटविले म्हणून, संबंधित व्यक्तीने त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाºयाचीच चारचाकी गाडी त्याच्या निवासस्थानामोरून पेटवून दिली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही घटना गांभिर्याने घेतली असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गारगोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पतंगे यांनी सुभाष देसाई यांनी पोलीस दलाच्या जागेत केलेले अतिक्रमण मागील आठवड्यात काढले होते. त्याच रागातून सुभाष देसाई यांनी ही पतंगे यांच्या ते भाड्याने राहत असलेल्या खासगी निवास्थानातील चारचाकी गाडीच मंगळवारी रात्री पेटवून दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे.
आकुर्डी येथे ही मंगळवारी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही हल्ला घडण्याचा प्रकार ताजा असतानाच गारगोटी येथे पतंगे यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केल्याने याची पोलीस यंत्रणेने गांभिर्याने दखल घेतली आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी नुकताच पोलिसांच्या मोकळ््या जागेत असलेली सर्व अतिक्रमण काढण्याच्या सूचना सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, यंत्रणेला दिल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पतंगे यांनी देसाई यांचे अतिक्रमण काढले होते, परंतु , या घटनेचा राग मनात धरून देसाई यांनी पतंगे यांचीच त्यांच्या स्वमालकीची चारचाकी गाडी त्यांच्या निवासस्थानमोरच रॉकेल ओतून पेटवून दिली. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.