कोल्हापूर : टपाल कार्यालयाच्या महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना परवाना नूतनीकरणासाठी महिला प्रतिनिधीकडून साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे येथील अल्पबचत अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. संशयित जयदीप चंद्रकांत सावदेकर (वय ४४, रा. उन्मेष सोसायटी, शाहूनगर, चिंचवड-पुणे) याच्यावर बुधवारी दुपारी लाईन बझार येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सापळा रचून कारवाई झाल्याने खळबळ उडाली. अधिक माहिती अशी, छाया चंद्रकांत निकाडे (४४, रा. पोहाळे तर्फ आळते, ता. पन्हाळा) या १९९७ पासून त्यांच्या गावामध्ये टपालाच्या मासिक अल्पबचत ठेवीची रक्कम गोळा करतात. त्यापोटी जमा झालेल्या रकमेतून त्यांना कमिशनचा मोबदला मिळतो. या कामाकरिता त्यांनी १९९७ मध्ये अल्पबचत अधिकारी, कोल्हापूर यांच्याकडून महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेचा परवाना घेतला होता. त्याचे दर तीन वर्षांनी नूतनीकरण करून घ्यावे लागत असे. त्याप्रमाणे २०१२ मध्ये नूतनीकरण केलेल्या परवान्याची मुदत ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत होती. मुदत संपल्यामुळे परवाना नूतनीकरणासाठी त्यांनी जुन्या परवान्याची प्रत जोडून मध्यवर्ती शासकीय इमारत येथील अल्पबचत अधिकारी कार्यालयात अर्ज दिला होता. परवाना न मिळाल्याने त्यांनी अल्पबचत अधिकारी सावदेकर याच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी नूतनीकरण वेळेत न केल्याने विलंब आकार म्हणून ५०० रुपये भरण्यास सांगितले. तो त्यांनी भरला असता अर्जामध्ये त्रुटी असल्याचे सांगून त्या दुरुस्त करून देण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा अर्ज सादर केला. बरेच दिवस परवाना न मिळाल्याने त्यांनी २१ सप्टेंबर २०१६ रोजी सावदेकर याच्याकडे पुन्हा चौकशी केली असता त्याने त्यासाठी साडेतीन हजार रुपये लाचेची मागणी केली. यावर छाया निकाडे यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उदय आफळे यांची भेट घेऊन तक्रार दिली. त्याप्रमाणे सापळा रचून दोन पंच साक्षीदारांसमक्ष लाचेची मागणी झाली आहे का, त्याची खात्री केली. त्यानंतर निकाडे यांना पैसे घेऊन पाठविले. त्यांच्याकडून साडेतीन हजार रुपये स्वीकारताना दबा धरून बसलेल्या पथकाने छापा टाकून सावदेकर याला रंगेहात पकडले. अचानक झालेल्या कारवाईने सावदेकर भांबावून गेला. कार्यालयात पंचनामा करून त्याला शनिवार पेठ येथील ‘लाचलुचपत’च्या कार्यालयात आणले. या ठिकाणी त्याच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. पुणे येथील पथकाकडून त्याच्या घराची रात्री उशिरा झडती घेण्यात आली.
पुण्यातील अधिकाऱ्यास लाच घेताना अटक
By admin | Published: October 06, 2016 1:29 AM