उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे दोन वर्षांपूर्वी पोलीस चौकी सुरु करण्यात आली होती. थोड्याच दिवसात ती बंद झाली होती. परंतु दोनच दिवसात पुन्हा एकदा पोलीस चौकी सुरु होणार असल्याचे सरपंच कलिमुन नदाफ यांनी सांगितले. कोरोना उपाययोजना संदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उदगाव येथे कोरोनाचे सत्तरहून अधिक रुग्णसंख्या झाल्याने ग्रामपंचायतीने उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे. कोरोना समितीने एकूण पंधरा पथके तयार केली असून तीन दिवसात संपूर्ण गावाचे थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिजन तपासणी करण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक पथकात गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य व स्वयंसेवक अशा पद्धतीने विभागणी केली असून सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली त्याचा दैनंदिन आढावा घेण्यात येणार आहे. तसेच गावातील वाढते अपघात, चोरीच्या घटना व बेकायदेशीर विक्री लक्षात घेता बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरु करण्यात यावी, असे सर्वानुमते ठरले. त्यासाठी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करुन देणार आहे. यावेळी पोलीस पाटील अनुराधा कांबळे, ग्रा. पं. सदस्य अरुण कोळी, दिलीप कांबळे, सलीम पेंढारी, हिदायत नदाफ, सौरभ पाटील, रमेश मगदूम, सावित्री मगदूम, दिपिका कोळी यांच्यासह कोरोना समितीचे सदस्य उपस्थित होते.
उदगाव येथे पोलीस चौकी सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:22 AM