कोल्हापूर : रंकाळा तलावातील पाणी टॉवर परिसरातून बाहेर पडत असल्याची वृत्त प्रसिद्ध झाल्याने भर पावसातही कोल्हापूरकरांनी शुक्रवारी रंकाळ्याकडे धाव घेतली. पण संपूर्ण रंकाळा परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने नागरिकांना अटकाव करण्यात आला.
२००५ मध्ये रंकाळा टॉवर परिसरातून रंकाळ्याचे पाणी बाहेर पडू लागल्याने रंकाळा फुटल्याच्या वृत्ताने पर्यटकांनी रंकाळा परिसरात मोठी गर्दी केली होती. गुरुवारीही रात्रीपासून रंकाळा टाॅवर वरून पाणी बाहेर पडू लागल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच शुक्रवारी नागरिकांनी मुसळधार पावसातही महापूर पाहण्यासाठी रंकाळा परिसरात प्रचंड गर्दी केली. रंकाळा परताळा परिसरातील काही गाळ काढून पाण्याला वाट करुन दिली, त्यामुळे रंकाळा भरुन टॉवर परिसरातून बाहेर येणारे पाणी पूर्ण बंद झाले आहे. पण नागरिकांची टॉवर परिसरात पूर स्थिती पाहण्यासाठी गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी टाॅवर परिसर, तांबट कमान, रंकाळा चौपाटी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. पूर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना पोलिसांनी अटकाव केला. नागरिकांना तलाव परिसरात थांबण्यास पोलिसांनी प्रतिबंध केले. तरीही वाशी नाका उद्यान, ब्रीज, पदपथ या रंकाळा परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये : पोलीस अधीक्षक बलकवडे
महापूराचे पाणी वाढतच असल्याने नागरिकांनी शक्यतो कामाशिवाय बाहेर पडू नये, रंकाळा तलाव, पंचगंगा नदी परिसर, कळंबा तलाव येेथे गर्दी करु नये. गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला असला तरीही नागरिकांनी गर्दी करुन पोलिसांवर अतिरिक्त ताण देऊ नये. अनेक ठिकाणी घरात पुराचे पाणी शिरल्याने तेथे मदतकार्य पोहचविण्यासाठी पोलीस यंत्रणा प्राधान्य देत आहे. आपत्ती व्यवस्थापनाला ही पोलीस यंत्रणाही मदत करत आहे. ज्या भागात पाणी पातळी वाढत आहे, त्या भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे. रस्त्यावर वाहनांची गर्दी करु नये, अत्यावश्यक सेवेतील वाहने मदतकार्यात असल्याने त्या वाहनांना वाट करुन देण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
- फोटो नं. २४०७२०२१-कोल-रंकाळा०१
ओळ : महापूर पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रंकाळा टॉवर परिसरात प्रतिबंध केले, त्यामुळे टॉवर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
फोटो नं. २४०७२०२१-कोल-रंकाळा०२
ओळ : रंकाळा तलावाच्या पाठीमागील बाजूचा परताळातील गाळ काढल्याने तेथून तलावातील अतिरिक्त पाण्याला मार्ग करुन दिल्याने रंकाळा तलावातील पाणी टॉवर पासून बाहेर येणे बंद झाले. पण तलाव काठोकाठ भरला.