कोल्हापूर : यादवनगरात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून माजी नगरसेवक रफिक मुल्लासह सहाजणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून नऊ हजारांहून अधिकच्या रोकडीसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत माजी नगरसेवक गायकवाड यांच्या मुलाचाही समावेश आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी, माजी नगरसेवक रफिक निसार मुल्ला, फिरोज मेहबूब बागवान, सचिन आप्पासाहेब गायकवाड (रा. तिघेही रा. यादवनगर), प्रकाश मधुकर हांडे (रा. शाहू कॉलनी), सिद्धाप्पा भीमाप्पा हळीजोळ (रा. वाय. पी. पोवारनगर), शब्बीर महंमद शेख (रा. सुभाषनगर) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित रफिक मुल्लाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर खोलीत पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवारी सायंकाळी पोलिसांनी येथे छापा टाकला. येथे पत्त्यांचा तीनपानी पलास नावाचा जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. या जुगार खेळणाऱ्या सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख नऊ हजार ३६० रुपये तसेच सहा मोबाईल संच, दोन मोपेड असा एक लाख ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, पोलीस कर्मचारी भूषण ठाणेकर, सुरेश काळे, एकनाथ कळंत्रे, अरविंद पाटील यांनी केली.
(तानाजी)