कळे (ता. पन्हाळा ) - येथील भरवस्तीत सुरु असणा-या तीन पानी जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकुन ८ जणांना ताब्यात घेतले तर ३ जण पळुन गेले. रोकड ५४०० जप्त केली. पळुन जाणा-यात एका प्राथमिक शिक्षकाचा तर एका सहा. फौजदार पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या पोलिस कर्मचा-याचाही समावेश आहे.कळे ( ता. पन्हाळा ) येथील चर्मकार वसाहतीच्या मुख्य रस्त्यावरील भर वस्तीत राजाराम उर्फ दुजा दादु पोवार यांच्या जुन्या घरातील माडीवर तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती कळे पोलिसांना मिळाली. त्यानुसार कळे पोलिसांनी घटनास्थळी साध्या वेषात दुचाकीवरुन जाऊन दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई केली.राजाराम उर्फ दुजा दादु पोवार ( वय-४६) , कुमार बाबुराव कासार( वय-६५) , प्रकाश पांडुरंग माळवे( वय-४०), मोहन पांडुरंग शिरसाट( वय-४५), शिवाजी धोंडीराम कुरणे(वय- ५०), सर्जेराव पांडुरंग सुतार ( वय-४७), सागर बाबुराव दंताळ(वय-४०), सखाराम सदाशिव इंजुळकर( वय-५५) सर्व रा. कळे ( ता. पन्हाळा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहेत.
कळे येथील जुगार अड्ड्याच्या परिसरातच राहणारा एक प्राथमिक शिक्षक, कळे पोलीस ठाण्यातुनच सहा. फौजदार या पदावरुन सेवानिवृत्त झालेले पोलीस कर्मचारी सर्जेराव पाटील (वय-६० रा. खाटांगळे, ता.करवीर ) व बाबासो शिवाजी पोवार ( रा. कळे) हे घटनास्थळावरुन पसार झाले.अधिक तपास सहा. पो. निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार रंगराव सौंदडे, पोलीस कॉन्स्टेबल बळवंत पाटील आदी करत आहेत.जुगाराचा अड्डा गेली २५ वर्षे सुरु कळे येथील हा जुगाराचा अड्डा गेली २५ वर्षे या ठिकाणी भर वस्तीत सुरु होता. शेजारच्या नागरीकांना याचा खुप त्रास होत होता. पण कोणीही तक्रार करत नव्हतं. कळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. तथापि हा अड्डा कायमचा बंद करावा अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.पोलिसांची कसोटीसुमारे दोन वर्षापुर्वीही कळे पोलिसांकडुन या जुगार अड्डयावर छापा टाकण्यात आला होता. परंतु कळे पोलिसांनी त्यावेळी केवळ समज देऊन सोडुन दिले होते. या कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात केलेल्या कारवाईत तरी कळे पोलीस या संशयीतांच्यावर योग्य कारवाई करणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागुन राहीले आहे.