कोल्हापूर : मटकाबुकीमालक विजय पाटील याच्या कांडगाव (ता. करवीर) येथील हॉटेल उत्सवनजीक मटका बुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने छापा टाकला. कारवाईत विजय पाटीलसह एकूण ११ जणांना अटक केली. छाप्यात पोलिसांनी ५० हजारांच्या रोकडसह ११ मोबाईल संच, चार दुचाकी, एक चारचाकी, देशी-विदेशी दारूचा साठा असा सुमारे ३ लाख ८ हजार ९११ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात मटका खुलेआम सुरू असल्याची चर्चा सुरू झाल्याने पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. अटक केलेल्या सर्वांना न्यायालयाने शुक्रवार (दि. २०) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अटक केलेल्यांची नावे अशी : विजय लहू पाटील (वय ५०, रा. कांडगाव), पांडुरंग दत्तात्रय चव्हाण (६२), उदय हिंदूराव चव्हाण (४२), सागर मारुती घोटणे (वय ३९), अमित आनंदराव लोखंडे (२८), अमित अतुल भाट (३५, सर्व रा. कांडगाव, ता. करवीर), दत्तात्रय बापू पाटील (४५), विजय बळवंत पाटील (३५), अनिल नंदकुमार लोखंडे (१९), शहाजी बाळासाहेब पाटील (४३, सर्व रा. देवाळे, ता. करवीर), युवराज बाळू पाटील (४२, रा. वाशी, ता. करवीर).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यात सर्वत्र खुलेआम मटका जुगार सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, कांडगाव (ता. करवीर) येथे मटका सूत्रधार विजय पाटील याच्या मालकीचे उत्सव हॉटेल आहे. हॉटेलच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये विजय पाटील मटक्याची बुकी चालवत असल्याची माहिती
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा येथे छापा टाकला, पत्र्याच्या बंदिस्त खोलीत एकत्र जमवून सामाजिक अंतर न ठेवता तसेच तोंडाला मास्क न लावता मटका जुगाराचे ऑफिस सुरू असल्याचे निदर्शनास आले. छाप्यात पोलिसांनी मटका जुगारप्रकरणी दहाजणांना, तर खोलीत विनापरवाना, बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या अमित भाट यालाही अटक केली. कारवाईत पोलिसांनी ३ लाख ८ हजार ९११ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
फोटो दुसऱ्या फाईलमधून पाठवत आहे...