लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दीड वर्षापूर्वी चोरीतील जप्त केलेले दागिने परत करण्याचे न्यायालयाने आदेश देऊनही ते परत केले जात नाहीत. त्याशिवाय करवीर पोलिसांच्या शिल्लक मुद्देमालातूनही ते सोन्याचे दागिने गायब झाले आहेत, त्याअर्थी त्या जप्त केलेल्या चोरीच्या दागिन्यांवर सुरक्षेची जबाबदारी दिलेल्या ‘खाकी’नेच डल्ला मारल्याची शक्यता पोलीस खात्यातून वर्तवली जात आहे. त्यामुळे कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.
चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोरी, लुटमार आदी गुन्ह्यांतील शेकडो तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यापैकी काही गुन्हे उघडकीस येऊन चोरट्याकडून पोलीस चोरीचा मुद्देमालही जप्त करतात; पण तो मुद्देमाल मूळ मालकाला न्यायालयाच्या आदेशानंतर परत करण्याची जबाबदारीही त्या-त्या पोलीस ठाण्याची आहे.
पाचगाव (ता. करवीर) येथे मे २०१२ मध्ये भर दुपारी पुष्पावती ठबे- येणेचवंडीकर या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे चार तोळ्याचे गंठण भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोघा चालकांनी हिसडा मारून चोरून नेले होते. त्या चोरट्यांना करवीर पोलिसांनी अटक केली, त्यांच्याकडून चोरीचे दागिनेही जप्त केले. जप्त केलेले दागिने पुष्पावती यांनी आपलेच असल्याचे ओळखले. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ११६/१२, आयपीसी ३७९,३४ दि. २९ मे २०१२ असा नोंद आहे.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. पुष्पावतींचे वटमुखत्यार त्यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोक येणेचवंडीकर (रा. पाचगाव, ता. करवीर, मूळ रा. बसर्गे, ता. गडहिंग्लज) यांनी घेतले. दि. ४ डिसेंबर २०१९ रोजी न्यायालयाने संबंधित जप्त केलेले दागिने मूळ मालक येणेचवंडीकर यांना परत करण्याचे आदेश करवीर पोलीस ठाण्याला दिले.
चौकशीची मागणी...
वारंवार चौकशी केली, दागिने मागणीसाठी अर्ज केले; पण चोरीचा जप्त केलेला मुद्देमाल परत दिला नसल्याने या प्रकरणात काही तरी गोलमाल असल्याची शंका निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोक येणेचवंडीकर यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी. तसेच दोषी आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येणेचवंडीकर यांनी केली आहे.
वार्षिक तपासणीतही ‘क्लीन चीट’
प्रत्येक पोलीस ठाण्यात चोरट्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालाची, गुन्ह्यांची निर्गत, शिल्लक मुद्देमालांची दरवर्षी वरिष्ठांच्या मार्फत तपासणी केली जाते; पण येणेचवंडीकर यांचा दागिना मुद्देमालात शिल्लकमध्ये दिसून येत नाही. तो येणेचवंडीकर यांना परत देण्यातही आलेला नाही. मग तो कोठे गायब झाला, तो कोणी नेला, याबाबत ठोस माहिती पोलीस ठाण्याकडून दिली जात नसल्याची स्थिती आहे.