सरुड : शासनाने ऑगस्ट २०१९ मध्ये जाहीर केलेल्या ५२०० पदांची पोलीस भरती प्रक्रिया पुन्हा एकदा कोरोनाच्या कात्रीत सापडली आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक निर्बंध लावल्याने राज्यातील पोलीस भरतीची ही प्रक्रिया दुसऱ्यांदा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या बेरोजगार तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र शासनाने २०१९ मध्ये टप्प्याटप्प्याने १२५२८ पदांची पोलीस भरती करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ऑगस्ट २०१९ मध्येच पहिल्या टप्प्यातील ५२०० पदांची जाहिरात प्रसिद्ध करून पोलीस भरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. यामध्ये राज्यातील लाखो तरुणांनी या भरतीसाठी जिल्हानिहाय अर्ज केले होते. दरम्यान, गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या शिरकावामुळे देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आणि येथेचे पहिल्या टप्प्यातील या पोलीस भरतीच्या प्रक्रियेला ब्रेक लागला. गेल्या मार्च महिन्यापासूून ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज्यातील प्रत्येक गावागावांत कोरोनाचा प्रभाव राहिला. नोव्हेंबरनंतर मात्र कोरोनाचा कहर कमी येऊ लागल्याने रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नव्याने वाढू लागली. सध्या कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने यावर्षीही कडक निर्बंध लावले आहेत. परिणामी याचा फटका पोलीस भरतीच्या प्रक्रियेला बसला आहे. सध्या या भरती प्रक्रियेसंदर्भात शासनाकडून कोणतेही आदेश न आल्याने अगोदरच रखडलेली ही भरती प्रक्रिया कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या व भरतीची वयोमर्यादा संपत आलेल्या बेरोजगार तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोरोनाची गंभीर बनलेली सद्य:परिस्थिती पाहता ही भरती प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.