कोल्हापूर : ऊसदरप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्यावरून दिले गेलेले आव्हान-प्रतिआव्हान आणि चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील एव्हीएच कंपनीविरोधात सुरू असलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हा दंडाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे. त्यापाठोपाठ पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शनिवारच्या प्रस्तावित मोर्चाला परवानगी नाकारली. दरम्यान, परवानगी नाकारली तरी पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणारच असा निर्धार आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी व्यक्त केला आहे. ऊसदरप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. भाजपने हा मोर्चा अडविण्याचा इशारा दिला.त्यानंतर मोर्चा अडवून दाखवाच असे प्रतिआव्हान राष्ट्रवादीने दिले आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चाला परवानगी नाकारणारी नोटीस शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना गुरुवारी दिली.१८ जूनपर्यंत बंदी आदेशमोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ३७ ( १) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये ५ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून ते १८ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत हा बंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच अगर पाचहून जादा व्यक्तींनी एक त्र जमा होण्यास, जमाव जमण्यास, मिरवणुका काढणे व सभा घेणे आदींसाठी मनाई केली आहे. (प्रतिनिधी) कायदा व सुव्यवस्थेसाठी निर्णयराष्ट्रवादीच्या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. जमावबंदी आदेश लागू झाल्याने तातडीने शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनीही एक नोटीस जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना दिली. पालकमंत्री पाटील हे खासगी निवासस्थानात तसेच दाट नागरी वस्तीत राहत असल्याने कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारण्यात येत असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.निवेदन स्वीकारण्याची विनंतीही अमान्यराष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा निर्माण चौकाजवळील मैदानावर घेण्यास, तर साखर कारखान्याचे अध्यक्ष, संचालक व प्रमुख पदाधिकारी अशा शंभर जणांना संभाजीनगर बसस्थानकापर्यंत जाण्यास परवानगी द्यावी आणि तेथे येऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवेदन स्वीकारावे, अशी विनंती आर. के. पोवार यांनी पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्याकडे केली परंतु ही विनंतीही अमान्य करण्यात आली आहे. मोर्चा कधी : ६ जून किती वाजता : १२ वाजता निर्माण चौकात २० हजार कार्यकर्ते जमणार कुठे काढणार : सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे नाळे कॉलनीतील निवासस्थान.
मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
By admin | Published: June 05, 2015 1:06 AM