न्यायालयाने संशयीत आरोपी धनराज ऊर्फ माँटी प्रकाश व्हटकर (वय ३२, रा. अयोध्या टॉवर, दाभोळकर चौकनजीक) याला शनिवारपर्यंत तर ओंकार रवींद्र आवळे (२०), रोहित राहुल भिंगारे (२१, दोघेही रा. कनान नगर) यांना आज, शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयीतांच्या हल्ल्यात वेद प्रकाश खानोलकर (वय २७, रा. जोतिर्लिंग कॉलनी, पाचगाव, कोल्हापूर) याचा हात जखमी होऊन त्याचा नऊ दिवसांनी मृत्यू झाला होता.
ताराबाई पार्क येथील बीएसएनएल टॉवरनजीक पूर्ववैमनस्यातून व एकमेकांकडे बघण्याच्या कारणांवरून ७ मार्च रोजी वेद खानोलकर या तरुणास लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी या खूनप्रकरणी अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता, सर्वांना पोलीस कोठडी सुनावली.