कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी मूक आंदोलनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ परिसरात भर पावसातही पोलिसांचा खडा बंदोबस्त राहिला. शहरात नाकाबंदी, ड्रोनद्वारे नजरया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात १२ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली. कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांनी आंदोलनस्थळावर नजर ठेवली होती. त्याशिवाय परिसरातील उंच इमारतींवर टेहाळणी करण्यासाठी पोलीस तैनात केले होते.
या आंदोलनाला होणारी गर्दी विचारात घेता, समाधीस्थळाकडे जाणारे सर्व वाहतुकीचे मार्ग पोलिसांनी रोखून धरले होते. मुसळधार पाऊस पडत असतानाही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. मराठा समाज आरक्षण मागणीसाठी सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनाचे आयोजन केले होते. पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात केल्याने त्यातच कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनाला होणारी गर्दी पाहता, आंदोलनस्थळाकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी रोखून धरले होते.
शहरात वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहतूक शहराबाहेरच रोखून ती परस्पर पर्यायी मार्गाने पुढे वळवली होती. याशिवाय शहरातील दसरा चौक, सीपीआर चौक, भाऊसिंगजी रोडवर जुनी मराठा बँक, सोन्या मारुती चौक, शिवाजी पूल याठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी अडवले होते.
याशिवाय दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील शंभर फुटी रोड, व्हीनस कॉर्नर परिसरातील गाडी अड्डा, चित्रदुर्ग मठ, महालक्ष्मी जीमखाना तसेच राजाराम रोडवर आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली होती. त्यामुळे हा परिसर वाहनांच्या पार्किंगने फुल्ल झाला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, अनिल गुजर, श्रीकृष्ण कटकधोंड, सीताराम डुबल हे अधिकारी आंदोलन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष ठेवून होते. याशिवाय सुमारे दीड हजारांहून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.