कोल्हापूर : गेली २० वर्षे बंद अवस्थेत असलेले येथील ईएसआय रुग्णालय केंद्र सरकारच्या कामगार विमा महामंडळातर्फे ताब्यात घेऊन १ मे २०१७ पासून ते सुरू केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगार विमा महामंडळ समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी केली. कोल्हापूरबरोबरच पुण्याचेही रुग्णालय सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले. खासदार खैरे यांनी शुक्रवारी सकाळी या रुग्णालयाची पाहणी केली. सर्व विभाग आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांनाही त्यांनी भेट देऊन माहिती घेतली. पंधरा एकर जागेमध्ये १०० खाटांचे हे रुग्णालय १९९७ साली बांधण्यात आले. मात्र ते वीस वर्षे होत आली तरी सुरू झाले नाही. सध्या या ठिकाणी राज्य सरकारचे एकूण १२ कर्मचारी कार्यरत आहेत. यानंतर पत्रकारांशी बोलताना खैरे म्हणाले, कोल्हापूरसह राज्यात चार ठिकाणी ईएसआय रुग्णालये आहेत. वीस वर्षे ही इमारत पडून आहे, याचे आश्चर्य वाटते. केंद्र सरकारच्या कामगार विमा महामंडळातर्फे हे रुग्णालय ताब्यात घेतले जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर आणि पुण्यातील बिबवेवाडी ही दोन्ही रुग्णालये मेपासून सुरू करण्यात येतील. ईएसआय रुग्णालय लाभार्थ्यांची वेतनमर्यादा १५ हजारांवरून २१ हजार रुपये केली आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारला ती २५ हजार करायची होती; पण अनेक कंपन्यांनी याला विरोध केला. त्यामुळे केंद्र सरकारने आता १० कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांनासुद्धा ईएसआय योजना लागू करण्याचे ठरविले आहे. ही योजना शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रांनाही लागू करण्याचा विचार आहे. ज्या खासगी रुग्णालयांचे ‘ईएसआय’सोबतचे करार संपले आहेत, त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. यावेळी कामगार विमा महामंडळाचे व्यवस्थापक दिलीप पाटील, दीपक साठे, संदीप कुमार, सामाजिक सुरक्षा अधिकारी के. डी. थोरात, समीर शेठ, उद्योग व कामगार संघटनांचे प्रतिनिधी एम. जी. जोशी, पी. बी. हरळीकर, शेखर सुतार, सुरेश पाटील, सर्जेराव यादव, मनीष परळे, आदी उपस्थित होते. ‘हे तर दुर्दैव...’ खैरे यांचा घरचा आहेरकर्मचाऱ्यांच्या वेतनातून जी ईएसआयची रक्कम जमा होते, त्यातील ८० टक्के रक्कम महामंडळ राज्य शासनांना देते. त्या निधीतून ही रुग्णालये चालवली जावीत, अशी अपेक्षा आहे. मात्र राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच कोट्यवधी रुपयांची ही इमारत इतकी वर्षे पडून आहे. त्याचा फायदा कामगारांना झाला नाही, हे दुर्दैव आहे, अशी टीका खैरे यांनी केली. खासदार खैरे यांनी राज्य शासनाला हा घरचा आहेरच दिल्याचे मानले जाते. खासदार महाडिक यांचेही प्रयत्नहे रुग्णालय सुरू व्हावे यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी २७ जुलै रोजी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. १५ एकरांवरचे १० कोटी रुपये खर्चून बांधलेले हे रुग्णालय सुरूच न झाल्याने वर्षाला तीन कोटी रुपयांचा निधी कामगारांकडून दिला जात असताना त्यांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णालय सुरू करण्याची मागणी महाडिक यांनी केली होती.तसेच आमदार अमल महाडिक यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदनही दिले होते. या पार्श्वभूमीवर खैरे यांनी भेट देऊन ही घोषणा केल्याचे पत्रक खासदार महाडिक यांच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
पोलिसांनी जप्त केली सहा लाखांची रोकड
By admin | Published: December 24, 2016 12:54 AM