लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा:कोल्हापूरच्यापोलिसांनी विभागीय क्रीडा स्पर्धेतील विजेतेपद पटकावल्याने त्याचा आनंद खुद्द कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही आवरता आला नाही. त्यांनी सैराट चित्रपटातील झिंग-झिंग झिंगाट या गाण्यावर आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर बसून डान्स केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
साताऱ्यात गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा सुरू होत्या. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसांपासूनच कोल्हापूर पोलिसांनी सांघीक आणि वैयक्तीक स्पर्धांमध्ये आघाडी घेतली होती. शेवटपर्यंत कोल्हापूर पोलिसांनी स्पर्धेतील वर्चस्व आपले कायम राखले. एवढेच नव्हे तर पुरुष आणि महिला गटांमध्ये कोल्हापूर पोलिसांनी विजेतेपद पटकावले.
पोलीस कवायत मैदानात बक्षीस वितरण पार पडल्यानंतर पोलिसांच्या बॅंड पथकाने सैराट चित्रपटातील झिंग-झिंग झिगाट हे गाणे वाजविण्यास सुरूवात केली तेव्हा कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही आपल्या कर्मचाऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा मोह आवरला नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनी अधीक्षक बलकवडे यांना खांद्यावर उचलून घेऊन डान्स सुरू केला. बलकवडे यांनीही हात उंचावून कर्मचाऱ्याच्या खांद्यावर बसूनच ठेका धरला. त्यांच्याभोवती इतर पोलीस कर्मचारीही डान्स करू लागले. या डान्सचा व्हिडीओ काहींनी शूट केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"