कोल्हापूर : लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, पापाची तिकटी या परिसरातील दुकानात येणाऱ्या धान्यांच्या अवजड वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते; त्यामुळे अशा वाहनांना उद्या, मंगळवारपासून शहरात कायमस्वरूपी प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख त्याच दिवशी काढण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कायम बंद ठेवण्यासाठी शेकडो नागरिकांनी लेखी निवेदने पोलीस प्रशासनाला दिले आहेत.शहरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीबाबत सातत्याने अभ्यास केला जात आहे. शहरात येणारे धान्याचे ट्रक, टेम्पोमुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. अवजड वाहनांना जे नियम घालून दिले आहेत, ते पाळले जात नाहीत. धान्य व्यापाऱ्यांना शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विक्रमनगर येथील जागेवर धान्याची गोडावून उभी करून दिली आहेत. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोईसुविधा व सुरक्षा उपलब्ध करून दिली आहे.
शहरात बाहेरून येणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांना दिवसभरात प्रशासनाने बंदी घातली आहे. नेहमी शहराच्या मध्यवस्तीतील शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी व्यापारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी दूर झाल्याने या दोन्ही व्यापारपेठांनी अखेर मोकळा श्वास घेतला. सध्या प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहतूक काही दिवसांसाठी सुरू होती. ती आता कायमस्वरूपी बंद केली जाणार आहे. या निर्णयाबाबत पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या हरकती मागविल्या होत्या.त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. शेकडो नागरिकांनी स्वत: शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात येऊन लेखी निवेदने दिली आहेत. त्यामध्ये अवजड वाहतूक कायम बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांनी धान्यांची अवजड वाहने शहरात न आणता विक्रमनगर येथील गोडवूनमध्ये धान्य उतरविण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. जे व्यापारी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले.