इचलकरंजी : लॉकडाऊन काळातही मॉर्निंग वॉक, विनामास्क व विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. यामध्ये तिन्ही पोलिस ठाण्याने एकूण १४० जणांवर कारवाई केली. तर गावभाग पोलिस ठाण्यात ८४ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली असून, तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.शहर व परिसरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. तरीही नागरिक नियमांचे उल्लंघन करत फिरत होते. त्यामुळे पोलिस अॅक्शन मोडमध्ये येत कारवाईला सुरुवात केली.
पोलिसांनी कडक कारवाई करत गावभाग ८४, शिवाजीनगर ३१ व शहापूर २५ अशा एकूण १४० जणांवर पोलिसांनी कारवाई केली. गावभाग पोलिसांनी ८४ जणांची अँटिजेन चाचणी केली. यामध्ये तीनजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह रुग्णांना मुसळे हायस्कूल येथील विलगीकरण कक्षात पाठवले आहे.