कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातील शिपाई ते सहाय्यक फौजदार या संवर्गातील बदलीपात्र अंमलदारांची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाली आहे. शासन आदेशामुळे बदल्यांना ३० जूनपर्यंत ब्रेक लागला असला तरीही शासनाचे पुढील आदेश येताच जुलैच्या पहिल्या अगर दुसऱ्या आठवड्यात बदल्या करण्यात येणार आहेत. सध्या सुमारे ३८० पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येत आहेत तर पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या ३३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. यापैकी ज्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात चार वर्षे व परिक्षेत्रात आठ वर्षे सेवाकाल पूर्ण झाला आहे, अशा आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर व कोल्हापूर परिक्षेत्राबाहेर होणार आहेत.
पोलीस दलातील प्रशासकीय बदल्या या दि. ३१ मेपूर्वी केल्या जातात. जेणेकरुन मुलांच्या शाळांबाबत कोणतीही गैरसोय होऊ नये, हा यामागील उद्देश असतो. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दि. ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा निर्णय शासनाने घेतला. विहीत कालावधी पूर्ण झालेले, विहीत कालावधी पूर्ण नाही परंतु मुदतपूर्व बदलीसाठी सादर केलेली लेखी विनंती व प्रतिकुल अहवालावरुन करावयाची बदली या तीन प्रकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदल्या करण्यात येत आहेत. बदलीपात्र अंमलदारांकडून माहिती मागवताना त्यांचे तीन पसंतीक्रम मागवून घेतले आहेत. बदलीवर नेमणूक देताना त्यांच्या पसंती क्रमानुसार तसेच पूर्वीच्या घटकाला झालेला कालावधी विचारात घेऊन त्यांना पसंतीक्रम देण्यास प्राधान्य व त्यानंतर क्रमानुसार दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीच्या ठिकाणी नेमणूक देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
जिल्ह्यात मुदतपूर्व विनंती बदलीसाठी ७८ पोलिसांनी अर्ज केले आहेत. जिल्ह्यात चार वर्षे व परिक्षेत्रात आठ वर्ष कालावधी पूर्ण झालेल्या ३३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत, त्यापैकी ५ पोलीस निरीक्षक, ३ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ह्या जिल्ह्याबाहेर व कोल्हापूर परिक्षेत्राबाहेर होत आहेत. शासनाचा पुढील आदेश आल्यानंतर जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात वरिष्ठ स्तरावरील बदल्या झाल्यानंतर येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत.
प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदलीचे संकेत
विविध प्रकरणांत गुंतलेल्या शहरातील काही वादग्रस्त प्रभारी अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांशी प्रभारी अधिकाऱ्यांच्या उचलबांगड्या होण्याचे संकेत आहेत.
संभाव्य बदल्या...
- पोलीस कर्मचारी (शिपाई ते सहाय्यक फौजदार) : ३८०
- विनंती बदल्या अर्ज : ७८
- पोलीस अधिकारी (फौजदार, सपोनि, पोनि.) : ३३
- जिल्ह्याबाहेर अगर परिक्षेत्राबाहेर बदल्या : ७
कोट...
पोलीस बदल्यांची माहिती तयार आहे, सध्या कोरोनामुळे बदल्यांसाठी स्थगिती असली तरी वरिष्ठ स्तरावरुन पुढील आदेश आल्यानंतर कदाचित जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तातडीने बदल्या करण्यात येतील.
- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.