कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी यांचे वाहन वाहतूक पोलिसांकरवी हायजॅक करण्याचा प्रयत्न बुधवारी झाला. विनंती नोटिसीनंतरही वाहन न दिल्यामुळे पालिका कर्मचारी वाहतूक पोलिसासह वाहन ताब्यात घेण्यासाठी आले. मात्र, जिल्हा नियोजन अधिकारी संगीता यादव यांनी वाहन देण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा दुसरी विनंती नोटीस देऊन पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांस माघारी जावे लागले. महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी शहरात सात कार्यालये सुरू केली आहेत. प्रत्येक कार्यालयात एक निवडणूक अधिकारी आणि दोन सहायक निवडणूक अधिकारी आहेत. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिवशंकर निवडणूक कामासाठी आवश्यक वाहनांची जमवाजमव करीत आहेत. यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांची वाहने ताब्यात घेण्याची मोहीम सुरू आहे. वाहन ताब्यात द्यावे, अशी विनंती नोटीस पहिल्यांदा दिली जात आहे. यानंतर वाहन ताब्यात न दिल्यास वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहन ताब्यात घेतले जात आहे. दरम्यान, निवडणूक कामांसाठी वाहने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी दुपारी एक वाजता वाहतूक पोलीस व पालिका कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन अधिकारी कार्यालयासमोर थांबलेल्या वाहनाजवळ आले. त्यांनी चालकास ‘तुम्हीच चालक का?’ अशी विचारणा केली. यावेळी संशय आल्याने चालकाने नाही, व्हय म्हणत होय, असे उत्तर दिले. त्यानंतर ‘ही नोटीस घ्या आणि वाहन घेऊन चला’, असे पोलिसांनी म्हणताच, चालकाने नकार देऊन मॅडमना भेटा, असे सांगितले. त्यामुळे ते मॅडमना भेटण्यासाठी गेले. तेथे त्यांनी सहायक नियोजन अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवडणूक कामासाठी वाहन हवे, असे सांगून त्यांच्या हातात विनंती नोटीस दिली. यावेळी सहायक नियोजन अधिकारी यांनी विविध ठिकाणी बैठका आहेत. वाहन मॅडमना लागणार आहे. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे, असे सांगितले. यावर समाधान न झाल्याने पोलिसाने तसे लेखी द्या, अशी मागणी केली. शेवटी सहायक नियोजन अधिकाऱ्यांनी महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून पोलिसांसोबत आलेल्या कर्मचाऱ्यांकडे तो दिला. यावेळी भ्रमणध्वनीवरून कर्मचाऱ्यास कानमंत्र दिल्यानंतर वाहन न घेताच पोलीस व पालिका कर्मचारी परत गेले. निधीसाठी जी... जी... वाहनासाठी दादागिरी...शासनाकडून आलेल्या निधीसाठी महापालिकेचे अधिकारी नेहमी जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे हातात फाईल घेऊन जी... जी... करीत नम्रपणे विनंती करीत असतात, परंतु बुधवारी पोलिसांकरवी नियोजन अधिकारी यांचे वाहन ताब्यात घेण्यासाठी दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.जिल्हा नियोजन विभागाकडे एकच वाहन आहे. रोज लहान-मोठ्या बैठका होत असतात. यासाठी वाहन लागते. त्यामुळे निवडणुकीसाठी वाहन देण्यास नकार दिला. जिल्हाधिकारी यांच्याशीही या विषयावर चर्चा केली आहे.- संगीता यादव, जिल्हा नियोजन अधिकारी
पोलिसांकडून वाहने हायजॅकचा प्रयत्न
By admin | Published: October 08, 2015 12:15 AM