कोल्हापूर : यात्रेनिमित्त मुंबईहून कोल्हापुरात येऊन रिक्षाने खेबवडे (ता. करवीर) येथे आलेल्या माहेरवाशिणीची सुमारे २५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञाताने हातोहात लंपास केल्याची घटना घडली. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक, वाय.पी. पोवार नगर ते खेबवडे या मार्गावर ही चोरीची घटना घडली. याबाबत गायत्री मिथुन भाट (रा. नवागाव बोरीवली, मुंबई. मूळ गाव- कसबा वाळवे, ता. राधानगरी) यांनी चोरीची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गायत्री भाट यांचे सासर मालाड (मुंबई), तर खेबवडे (ता. करवीर) हे माहेर आहे. त्यांचे पती मिथुन भाट हे मुंबईत पोलीस कॉन्स्टेबल आहेत. खेबवडे गावची यात्रा असल्याने गायत्री भाट या भाऊ ओंकार भाट यांच्यासोबत मुंबईहून कोल्हापुरात बसने आल्या. त्यानंतर त्यांनी ओळखीची रिक्षा बोलवली. रिक्षातून ते दोघे मध्यवर्ती बसस्थानक, शिवाजी उद्यमनगर, वाय.पी. पोवार नगर मार्गे खेबवडे गावी गेले. घरासमोर रिक्षातून उतरताना त्यांना त्यांची सोन्याचे दागिने असलेली बॅग नसल्याचे लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केली; पण बॅग मिळाली नाही.
त्या चोरीला गेलेल्या बॅगमध्ये तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याचे मंगळसूत्र, सहा तोळे वजनाच्या एकूण सहा बांगड्या, तीन तोळ्याचा राणी हार, दीड व एक तोळ्याचे कानातील झुमके जोड, कर्नवेल जोड, कर्णफुले, हार, बदाम, आदी एकूण २५ तोळे सोन्याचे दागिने होते. याबाबत भाट यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला गेल्याची तक्रार दिली.
मार्गावरील सीसीटीव्ही तपासणी
कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकावर इतर बॅगांसोबत सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षात ठेवली, त्यानंतर रिक्षा ज्या मार्गावरून खेबवडे गावापर्यंत पोहोचली, त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासले. शिवाजी उद्यमनगरात बेकरीच्या दारात रिक्षा थांबवून साहित्य घेण्यासाठी भाट उतरल्या, त्यावेळेपर्यंत संबंधित बॅग रिक्षात असल्याचे फुटेजमध्ये दिसते. त्यानंतर ती बॅग रिक्षातून गायब झाल्याचे आढळले. त्यानुसार पोलीस शोध घेत आहेत.