कोल्हापूर : छेडछाड, विनयभंग, बलात्कार अशा घटना रोखण्यासाठी ‘निर्भया सी स्क्वाॉड’ उद्या, सोमवारपासून कोल्हापूर परिक्षेत्रात कार्यरत होणार आहे. या स्क्वॉडमधील पोलिस साध्या वेशात शहरातील विविध परिसरांची टेहळणी करतील, चित्रीकरण करतील. छेडछाडीविरोधात तक्रार करण्यासाठी मुली पुढे आल्या तर चांगलेच आहे; पण त्या येण्याची वाट न पाहता पोलिस स्वत:च गुन्हे दाखल करतील, अशी घोषणा विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी येथे केली.‘लोकमत’च्या वतीने मैत्रीदिनानिमित्त आयोजित ‘स्त्रीसन्मानाची मानवी साखळी’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाटील म्हणाले, निर्भया प्रकरणानंतर विनयभंग, बलात्कार या गुन्ह्यांच्या व्याख्या अधिक विस्तृत करण्यात आल्या. सामाजिक दबावही वाढला; परंतु तरीही या घटनांना म्हणावा तेवढा आळा आपण घालू शकलेलो नाही. त्यासाठीच महिलांबद्दलची समाजभावना बदलण्याची गरज आहे. हे काम अशा उपक्रमांतून वाढीस लागेल. जाणीवजागृती आणि शिक्षण हे कायद्याच्या आधीचे दोन टप्पे आहेत. आताच्या पिढीला नागरिकशास्त्र हातात दंडुका घेऊन शिकवावे लागते. मात्र प्रत्येक गोष्ट फक्त कायद्यानेच नव्हे तर नीतीनेही करायची असते, याचा विचार झाला पाहिजे. ‘लोकमत’ने आयोजित केलेला हा स्त्रीसन्मानासाठी मानवी साखळीचा उपक्रम चांगला असून, त्यामुळे याविषयीची रचनात्मक भूमिका निर्माण होईल, असे पाटील यांनी सांगितले.
पोलिसच देणार छेडछाडीची फिर्याद
By admin | Published: August 07, 2016 12:57 AM