पाचगाव : पाचगाव (ता. करवीर) येथील पोलीस पाटीलपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने दाखल्यासाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पाचगावातील रिक्त पोलीस पाटील पद त्वरित भरावे, अशी मागणी होत आहे. पाचगावाचे पोलीस पाटील तात्यासाहेब पाटील यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्यानंतर हे पद रिक्तच आहे. जवळजवळ ३५ हजार लोकसंख्या असलेल्या पाचगावच्या रिक्त पोलीस पाटील पदाची जबाबदारी कळंबा गावच्या पोलीस पाटील यांच्यावर सोपविली आहे. मात्र, त्यांची व पाचगावमधील लोकांची ओळख नसल्याने दाखले देताना कळंबा गावच्या पोलीस पाटलांची अडचण होत आहे. त्यामुळे दाखल्यासाठी लोकांना व विद्यार्थ्यांना अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत. तसेच एखादी घटना घडल्यास पोलीस पाटलांना वर्दी मिळून ते येईपर्यंत घटनेचा तपास होण्यास उशीर होत आहे. त्यामुळे पाचगावचे रिक्त पोलीस पाटील पद लवकर भरावे, अशी मागणी जोर धरत आहे.
कोट :
गेल्या दोन वर्षांपासून पाचगावमध्ये पोलीस पाटीलपद रिक्त आहे. पद रिक्त असल्याने दाखल्यासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे.
- संजय पाटील, अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ