कोल्हापूर : ‘आयआरबी’च्या शहरातील सर्व नऊ टोलनाक्यांवरील वसुलीच्या प्रकाराचा आढावा पोलीस अधीक्षक कार्यालयात काल, शनिवारी पोलिसांनी घेतला. पोलिसांकडे नोंद केलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त दुसरे कर्मचारी आढळल्यास किंवा वाहनधारकांना दादागिरी केल्यास अधिकाऱ्यांनी अद्दल घडविण्याचा इशारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या दणक्याने हबकलेल्या कर्मचाऱ्यांनी टोलनाक्यावर पूर्वीप्रमाणे कोल्हापूरच्या वाहनांबाबत पुन्हा ‘गांधीगिरी’ सुरू केल्याचे चित्र आहे. शिये, शिरोली व शाहू या नाक्यांवर पोलिसांनी व्हिडीओ चित्रीकण सुरू केले असून, कायद्याचा भंग करणाऱ्या नाक्यावरील कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलीस फिर्यादी होणार आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच शहरातील सर्वच नऊ टोलनाक्यांवर ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांनी वसुली ‘टाइट’ केली. गेले चार महिने कोल्हापूर पासिंगच्या गाड्यांना मिळणारी अलिखित सवलतही त्यामुळे बंद झाली. कोल्हापुरातील बहुतांश वाहनचालकांचा टोल देण्यास पूर्वीपासूनच नकार आहे. त्यामुळे सर्वच नाक्यांवर कर्मचाऱ्यांच्या दादागिरीमुळे कोल्हापूरसह इतर वाहनधारकांशी खटके उडण्याचा प्रकार घडू लागला. नाक्यांवरील अडवणुकीच्या प्रकारामुळे वाहनांच्या रांगाही लागू लागल्या. हा सर्व प्रकार गेले चार दिवस ‘लोकमत’ने सातत्याने छायाचित्रांसह प्रकाशित केला. टोलविरोधी कृती समितीनेही टोलनाक्यांवरील कर्मचाऱ्यांच्या दादागिरीबाबत राजारामपुरी पोलिसांत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. परिणामी या सर्व प्रकारांत पोलिसांनी हस्तक्षेप करीत ‘आयआरबी’च्या टोलनाक्यांवरील व्यवस्थापनास बोलावून चांगलाच दम दिला. नाक्यांवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांचा भरणा केल्याची तोंडी तक्रार वाहनधारकांनी पोलिसांकडे केली होती. आयआरबीने त्यांच्याकडे काम करणाऱ्या १५० हून अधिक कर्मचाऱ्यांची पोलिसांकडे यादी सुपूर्द केली. नाक्यांवरील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी मोहीमही हाती घेतली आहे. पोलिसांकडील नोंदीव्यतिरिक्त कर्मचारी नाक्यांवर आढळल्यास त्यांना तत्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर टोलविरोधात हिंसात्मक रोष व्यक्त होऊ लागल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत नाक्यांवरील दादागिरीस पायबंद घालण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी) नाक्या- नाक्यांवर पोलिसांची ‘नजर’ ४शहरातील फुलेवाडी, शाहू, शिरोली व शिये हे टोलनाके संवेदनशील समजले जातात. फुलेवाडी नाक्यावर करवीरच्या पश्चिम भागांतील नेते व नागरिकांचा वचक असल्याने याठिकाणी सुरुवातीपासून टोलवसुलीचा तगादा लावला जात नाही. त्यामानाने इतर नाक्यांवर कर्मचाऱ्यांच्या अरेरावीचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. आता पोलिसांनी शाहू, शिरोली व शिये या तीन टोलनाक्यांवर व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. दादागिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्यामुळे कायद्याचा बडगा उगारणे सोपे होणार आहे. दादागिरीसही आळा बसणार आहे.
पोलिसांचा ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांना दम
By admin | Published: September 22, 2014 1:10 AM