अनिल पाटील-- मुरगूड --कॉलेज कॅम्पस्मधील कोणताही कार्यक्रम म्हणजे हुल्लडबाजी, हाणामारी, छेडछाडी करणारेच तरुण. त्यांना शांत करणारे शिक्षक, प्राध्यापक हेच चित्र कॉलेज कॅम्पसमध्ये नेहमीच दिसून येते; पण पोलीसमित्र बनण्यासाठी अगदी शिस्तबद्ध वर्तन करीत, मांडीला मांडी लावून, तहान भूक हरवून हजारो तरुण-तरुणी एकत्र आले. तरुणांचा उत्साह पाहून चक्क पोलीस अधिकारीही भांबावून गेले. पोलीसमित्र बनण्यासाठी मुरगूडच्या हजारो तरुण-तरुणींना खाकी वर्दीने जणू भुरळच घातली होती. एरव्ही पोलीस ठाण्यामध्ये ढुंकूनही न पाहणारे युवक-युवती मंगळाकरी मात्र अगदी बिनधास्तपणे ठाण्याच्या आवारात एकत्र जमले होते. निमित्त होते मुरगूड पोलिसांनी केलेले तरुणांना पोलीसमित्र बनण्याचे आवाहन. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यांनी प्रत्येक गावातून पोलीसमित्र तयार करावेत. याच धर्तीवर मुरगूडचे सहा. पो. निरीक्षक चंद्रकांत म्हस्के, सहा. पो. उपनिरीक्षक एस. एस. कवितके, अधिकारी तांबे यांनी मुरगूड विद्यालय, शिवराज कॉलेज, दूध साखर महाविद्यालय, मंडलिक महाविद्यालय या ठिकाणी आवाहन केले आणि अपेक्षेपेक्षा जास्त तरुण व तरुणींनी हजेरी लावली. नियोजित सभागृह खचाखच भरून व्यासपीठावर सुद्धा तरुण-तरुणींनी बैठक मारली होती. त्याचबरोबर सभागृहाबाहेरही तितकेच तरुण उभे होते. सपोनि चंद्रकांत म्हस्के यांनी मुरगूड पोलीस ठाणे कागल तालुक्यातील ५७ गावांत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करीत असून, काहीवेळा गावांमधील घडामोडींवर लक्ष ठेवणे पोलिसांना अडचणीचे ठरते. त्यावेळी पोलीसमित्र आपल्याला मोलाची मदत करतील, असे सांगून आपण ६० पोलीसमित्र तयार करणार होतो; पण तरुणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही संख्या ३०० पर्यंत नेण्याचा प्रयत्न करून नि:स्वार्थी सेवा करणाऱ्या तरुणांना ओळखपत्र व प्रशस्तिपत्र दिले जाईल.आभार सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. कलितके यांनी मानले. यावेळी पीएसआय तांबे, संजय देसाई, विलासराव पाटील, नितीन सावंत, भैरवनाथ मुळीक, तुकाराम सूर्यवंशी, विक्रम तावडे, संतोष भाट, राजू ओंबासे, राणे, आदी प्रमुख उपस्थित होते. दत्ता वारके यांनी सूत्रसंचालन केले. तरुणींचा सहभाग उल्लेखनीयकॉलेजच्या जवळपास पाचशे तरुणींनी मुरगूड पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पोलीसमित्र बनण्यासाठी हजेरी लावली. नक्कीच ही संख्या आश्चर्यकारक आणि आदर्शवत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत म्हस्के यांनी सांगितले.
‘पोलीसमित्र’साठी मुरगूडमध्ये तरुणाईची तोबा गर्दी
By admin | Published: December 01, 2015 10:19 PM