कोल्हापूर : राज्याचे लक्ष वेधलेल्या पेठवडगाव येथील जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार (वय २१) याचा मृत्यू पोलिस मारहाणीत झाल्याचे दोषारोपपत्रात सिद्ध झाले. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी आरोपी पेठवडगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संजीव रामचंद्र पाटील (४५, मूळ सोलापूर, सध्या रा.पाषाण पुणे ), सहायक फौजदार बबन दादू शिंदे (५७, रा. पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा), पोलिस नाईक धनाजी शिवाजी पाटील (४८, रा. लाईनबझार कोल्हापूर) यांना जन्मठेप आणि प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली.२५ हजार रुपये दंडाची रक्कम ही मृत पोवार याच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तीस वर्षांपूर्वी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्ये अरुण पांडव या आरोपीचा कोठडीमध्येच मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोघा पोलिसांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर पोलिस दलात शिक्षा झालेली ही दुसरी घटना आहे.खटल्याची पार्श्वभूमी अशी, २३ आॅगस्ट २०१४ रोजी वडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दलित समाजाचे आंदोलन सुरू होते. दुपारी दीडच्या सुमारास के. एम. टी बसच्या काचा फोडून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी संशयित आरोपी सनी पोवार यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. सहायक फौजदार बबन शिंदे याने हातातील काठीने मारहाण करीत त्याला शिवाजी हॉटेलपर्यंत नेले. त्यानंतर पोलिस जीपमधून त्याला पोलिस ठाण्यातील टीव्ही रूममध्ये ठेवले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक संजीव पाटील यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावर शिंदे व पोलिस नाईक धनाजी पाटील हे मारहाण करून चौकशी करीत असताना अचानक त्याच्या पोटात दुखू लागल्याने कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पाठीवर, पायांवर मारहाणीचे वळ स्पष्ट दिसत असल्याने त्याच्या मृत्यूचे पडसाद वडगावसह कोल्हापुरात उमटले. साहेब, आमच्या मुलांचा विचार व्हावा...पोलिसांनी तीन आरोपींना न्यायाधीश बिले यांच्यासमोर उभे केल्यानंतर त्यांनी आरोपींना शिक्षेबाबत विचारणा केली. आरोपींनी घटनेला उजाळा देण्याचा प्रयत्न केल्यानंतर न्यायालयाने त्यांना थांबवून केवळ शिक्षेविषयी बोलण्यास सांगितले. यानंतर तिघांनीही आमच्यावर मुलांची जबाबदारी आहे. तसेच कौटुंबिक परिस्थितीचे कारण देत कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली. प्रचंड तणावात असलेल्या तिघांना न्यायालयाने शिक्षा सुनावताच अश्रू आवरता आले नाहीत. त्यांची दयनीय अवस्था पाहून कुटुंबीयांनीही आक्रोश केल्याने काहीकाळ वातावरण भावनिक झाले.
दोघा अधिकाऱ्यांसह पोलिसास जन्मठेप
By admin | Published: January 28, 2017 1:16 AM