संदीप बावचे
जयसिंगपूर
:अवघ्या पाच महिन्यावर येऊन ठेपलेल्या येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेला स्वीकृत नगरसेवक पदाचे वेध लागले आहेत. राजर्षी शाहू विकास आघाडीकडून दोघांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाकडून आतापासूनच बेरजेची गणिते मांडली जात आहेत.
येथील पालिकेवर राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता असून विरोधी ताराराणी आघाडीकडे नगराध्यक्ष पद आहे. काही अपवाद वगळता दोन्ही आघाडीचे बहुतांशी नगरसेवक शहर विकासासाठी एकत्र येऊन काम करीत आहेत.
गेल्या साडेचार वर्षात दोन्ही आघाड्यात बिघाडी झाली होती. काही प्रमुख विकासकामांत सहमतीचे राजकारण देखील दिसून आले. मात्र, गेल्या दोन वर्षापासून दोन्ही आघाड्यात समझोता एक्स्प्रेस धावत आहे. येत्या डिसेंबरमध्ये नगरपालिकेची मुदत संपणार आहे. दरम्यान, भाजपाने यापूर्वीच स्वबळावर निवडणूक लढविण्याचे घोषित केले आहे. तर सध्या राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असे महाविकास आघाडीचे सरकार आहे. येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील, असे देखील नेत्यांनी यापूर्वी घोषित केले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत टोकाची ईर्ष्या असल्यामुळे नगरपालिका निवडणुकीत महाविकास विकास आघाडी एकत्र येणार का, याबाबतही सध्या प्रश्नचिन्ह आहे. सध्या कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडतील, अशी चर्चा असली तरी अवघ्या पाच महिन्यावर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीच्या निमित्ताने कारण, राजकारण सुरु झाले आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवकपदी दोघांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे स्वीकृतची लॉटरी कोणाला लागणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
--------------------
बदलते राजकारण
येणाऱ्या निवडणुकीत लोकनियुक्त ऐवजी नगरसेवकातून नगराध्यक्ष पद निवडले जाणार आहे. तर एक सदस्य प्रभागरचना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी आतापासून राजकीय डावपेच सुरु झाले आहेत. गत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र होते. बदलत्या राजकारणामुळे येणाऱ्या निवडणुकीत फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपाचे अनिल यादव यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.