राजाराम कांबळे -- मलकापूर -आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व मलकापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तालुक्याच्या विकासासाठी जनसुराज्य काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. आगामी काळात वेगळ््या घडामोडी होणार आहेत.शाहूवाडी तालुक्यात पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला ऊत आला आहे. आपला गट शाबूत राखण्यासाठी नेतेमंडळी प्रयत्न करताना दिसत आहेत. तालुक्यात सेनेचे आमदार सत्याजित पाटील हे तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. शाहूवाडीमध्ये सेनेचा दबदबा आहे, तर पन्हाळ््यामध्ये विनय कोरे यांचा दबदबा आहे. दोन्ही तालुक्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी ताकद आहे, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचादेखील गट प्रबळ आहे.येळवणजुगाई येथील जनसुराज्य पक्षाच्या कार्यक्रमात एका व्यासपीठावर खासदार राजू शेट्टी, माजी आमदार विनय कोरे काँग्रेसचे करणसिंह गायकवाड जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील, आदी दिग्गज मंडळी एकत्र होती.तालुक्याच्या राजकीय पटलावर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती उघड आहे, तर जनसुराज्य पक्ष व काँग्रेस एकत्र काम करीत आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटना जनसुराज्य व काँग्रेसबरोबर भविष्यातील राजकीय पटलावर एकत्र राहिल्यास त्यांची ताकद वाढणार आहे. राजकारणात कोण कोणाचा मित्र व शत्रू नसतो. त्यामुळे आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीत बरीच उलथा-पालथ होणार आहे.तालुक्याच्या विकासासाठी विरोध केल्यास मी त्यांना सोडणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे भविष्यात खासदार इतर पक्षाच्या नेत्यांना मदत करणार हे सिद्ध झाले आहे. विनय कोरे यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेस पक्षाची साथ महत्त्वाची आहे, तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी खासदार राजू शेट्टी यांना जनसुराज्य व काँग्रेसची मदत कामी येणार आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात खासदार राजू शेट्टी व साखरसम्राट कधी एकत्र आले नाहीत. भाजपने देखील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेचा वापर करून घेतला. त्यामुळे राजू शेट्टी भाजपवर नाराज आहेत. आगामी काळात लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना इतरांची मदत घेणे गरजेचे आहे. स्वबळावर निवडणूक लढविण्याची ताकद कोणत्याच पक्षात राहिलेली नाही. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिका निवडणुकीत याची झलक पहावयास मिळणार आहे.लोकसभेचा राग : सेनेची मदत नाहीविधानसभेच्या निवडणुकीत सेनेचे आमदार सत्यजित पाटील यांना शाहूवाडीने मदत केल्याने सत्यजित पाटील यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. मात्र विनय कोरे यांना राष्ट्रवादीने विरोध केला. खासदार राजू शेट्टी यांना लोकसभेच्या निवडणुकीत सेनेची मदत झाली नाही, याचा राग त्यांच्या मनात आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांनी जनसुराज्य व काँग्रेस यांच्याशी सलोखा निर्माण करण्यासाठी त्यांनी इतर पक्षाच्या नेत्यांशी संबंध सुधारण्यास सुरुवात केली आहे.
शाहूवाडीत राजकीय समीकरणे बदलणार
By admin | Published: February 17, 2016 12:06 AM