भारत चव्हाण ।
कोल्हापूर : राजकीय संघर्ष आणि खुन्नस यांमुळे अनेकांचे नेतृत्व कुजले, जिल्ह्याचा विकास खुंटला, याची सदोदित आठवण करून देणारा इतिहास समोर असताना, त्यातून काही शहाणपण शिकण्याची अपेक्षा असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत नव्या पिढीतील राजकारण्यांनी त्याच मार्गाने वाटचाल सुरू केली आहे. ‘एक तर आम्ही टिकू, नाही तर तो टिकेल’ इतकी पराकोटीची राजकीय खुन्नस जर नेत्यांकडून बाळगली जात असेल, तर त्यातून चांगलं काही घडणार नाहीच आणि घडलंच तर ते जिल्ह्याच्या दृष्टीने हानिकारक असेल. त्यामुळे आपलं नेतृत्व फुलवायचं की आगीत तेल ओतणाऱ्यांच्या ओंजळीत राहायचं, याचा विचार करण्याची वेळ जिल्ह्यातील नेतेमंडळींवर आलेली आहे.
महाराष्ट प्रदेश कॉँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेचा प्रारंभ नुकताच कोल्हापुरातून झाला. त्यातूनच पक्षांतर्गत आणि सहकारी पक्षाबरोबरचा संघर्ष तसेच खुन्नस हा विषय चर्चेचा बनला आहे. खरं तर जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने चर्चेत आलेला विषय विचारमंथन करायला लावणारा असला तरी नेते त्याकडे कशा दृष्टीने त्याकडे पाहणार, या मानसिकतेवर तो अवलंबून आहे. म्हणूनच इतिहासाचे अवलोकन करून सुज्ञपणाने वेळीच सुधारणा केली नाही, तर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे निश्चित असेल.
जेव्हा नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष पेटतो तेव्हा अदृश्य व अस्वस्थपणे काठावर बसून या संघर्षात तेल ओतणाºयांचे फावते. एकमेकांचा काटा काढण्याची संधी त्यांना आपसूक मिळत जाते. संघर्ष उफाळल्यावर मिटविण्याऐवजी तो अधिक पेटविण्यातच अनेकांचे हित असते. कोल्हापूरने अनेक प्रसंगांत, अनेक संघर्षांत ते अनुभवले. राज्याचे नेतृत्व करण्याची, पक्षनेतृत्वावर वचक ठेवण्याची क्षमता, देशाच्या पातळीवर काम करण्याची गुणवत्ता असणाºया नेत्यांचे नेतृत्व अंतर्गत संघर्षातून कुजले. जिल्ह्यातील तसेच जिल्हाबाह्य शक्तींनी अशा संघर्षात आगी लावून त्यांना राजकारणातून हद्दपार करण्याचे काम केले. जिल्ह्यातील रत्नाप्पा कुंभार - म. दुं. श्रेष्ठी यांच्यापासून ते खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्षाचा अभ्यास केला तर तेच दिसून येते.
आता महाडिक, पाटील तीच चूक करताहेतराजकीय संघर्षातून कोणाचे भले होत नाही, हा इतिहास असताना नव्या दमाचे, ताकदवान नेते एकमेकांशी भिडण्याची चूक घडत आहे. खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्ष सध्या चर्चेचा आणि पक्षीय नेत्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. या संघर्षाची किंमत दोघांनीही चुकती केली आहे. त्यांनी लढविलेल्या निवडणुकीच्या खर्चाचे आकडे पाहिले तर ते लक्षात येते. सतेज पाटील यांचे राजकारण विधानसभेशी, तर धनंजय महाडिक यांचे राजकारण लोकसभेशी निगडित आहे. दोघांचेही काम चांगले आहे. तसे पाहिले तर ते एकमेकांच्या राजकीय मार्गांत कुठेही आडवे येत नाहीत. तरीही संघर्ष पेटलाय. स्थानिक भांडणात अडकल्यामुळे त्यांचे त्यांच्या मूळ ध्येयाकडे दुर्लक्ष होत आहे. निवडून येण्याची क्षमता, कार्यकर्त्यांचे मोहोळ, नेतृत्व करण्याची ताकद, राजकारणातील सर्व उपलब्ध साधने असूनसुद्धा ही मंडळी एकमेकांना शह देण्यात ताकद खर्च करीत आहेत. राजकारणात ‘कोणी कायमचा शत्रू नसतो’ हेच दोघे विसरलेले आहेत. त्यामुळे त्यांना पुढे जाण्याची संधी असताना ते ती गमावतात की काय, अशी भीती व्यक्त होतेय.
अपराजित नेतृत्व !महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, विखे-पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, आदी आघाडीवर होते. त्यांना कधीच स्थानिक संघर्षात गुंतावे लागले नाही. ते सतत निवडून येत राहिले. अलीकडच्या काळातही आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार, पतंगराव कदम, एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे, आदी नेते सतत विजयी होत राहिले, म्हणून ते राज्य नेतृत्वाच्या फळीत चमकले. या पातळीपर्यंत तरी कोल्हापूरचे नेतृत्व जाणार का? आपण नेतृत्व तयार करणार की, त्यांना झुलवत ठेवून येथेच संपविणार? असा सवाल उपस्थित होतो.केंद्रीय मजल नाहीच..!कोल्हापूर जिल्ह्यात अंतर्गत राजकारणात अडकलेल्या आणि त्यांना अडविणाºया समर्थकांनी दिल्लीवर स्वारी करण्याचे स्वप्न कधी पाहिलेच नाही. जिल्ह्यातून सुरुवातीपासून दोन खासदार निवडून दिले जातात, पण सत्तर वर्षांत एकजणही केंद्रीय मंत्रिपदावर पोहोचले नाहीत. राज्यसभेवरही एकाची निवड झाली नाही. छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपतीकृत नियुक्ती हे पहिले राज्यसभा सदस्यत्व आहे. स्थानिक राजकारणातील ईर्ष्येने दिल्लीत नेतृत्व करण्याचे राहूनच गेले.रत्नाप्पाण्णांची ताकद स्वकियांविरुद्ध लढण्यात खर्चीजिल्ह्यातील एक खंबीर नेतृत्व तसेच ज्यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता होती, असे रत्नाप्पाण्णा कुंभार अंतर्गत कुरघोड्या आणि पाडापाडीच्या राजकारणाचे बळी ठरले. रत्नाप्पाण्णा केवळ जिल्ह्याचेच नेते नव्हते, तर अक्कलकोट संस्थानापासून जमखंडीपर्यंतच्या पट्ट्यातील राजकारणावर त्यांची मजबूत पकड होती; पण त्यांच्या या लोकप्रियतेला जिल्ह्यातच रोखण्याचे प्रयत्न सांगली व सातारा जिल्ह्यांतून झाले. त्यातून रत्नाप्पाण्णांचे पहिले राजकीय शत्रू म्हणून गडहिंग्लजमधील कडगावच्या म. दुं. श्रेष्ठी यांना उभे केले गेले. १९५७ च्या सुमारास हेच दोन गट जिल्ह्यात अस्तित्वात होते. त्यानंतर उदयसिंगराव गायकवाड, बाळासाहेब माने, दिनकरराव यादव या बहुजन समाजातील नेत्यांशी रत्नाप्पाण्णांचे संघर्ष उडाले. व्ही. के. चव्हाण यांनी तर रत्नाप्पाण्णांना जिल्हा बॅँक, जिल्हा परिषद, भूविकास बॅँकेतही घुसखोरी करू दिली नाही. त्यांची संपूर्ण हयात संघर्षात गेली. त्यांची सगळी ताकद क्षीण करण्याचा प्रयत्न जिल्हाबाह्य शक्तींकडून झाला. त्यामुळे त्यांचे नेतृत्व जिल्ह्यातच रोखले गेले. त्यांच्या रूपाने राज्याला मिळणारे नेतृत्व अंतर्गत राजकारणामुळे कुजले.मंडलिकांच्या बाबतीत तोच प्रयोगस्पष्टवक्ता आणि स्वाभिमानी नेता म्हणून सदाशिवराव मंडलिक यांच्याकडे जिल्हा पाहत होता. रत्नाप्पाण्णांनंतर ‘लोकनेता’ म्हणून नावलौकिक मिळविणारे मंडलिक हे जिल्ह्यातील शेवटचेच नेते ठरले. सुरुवातीला त्यांचे विरोधक विक्रमसिंह घाटगे यांच्याशी असलेले हाडवैर जिल्ह्याने पाहिले; परंतु त्या संघर्षात नीतिमत्ता होती. राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अधिकारवाणीने सल्ले देण्याची हिंमत मंडलिकांमध्ये होती. प्रसंगी पक्षनेतृत्वावर टीका करण्याचेही धाडस त्यांच्यात होते. त्यामुळे त्यांचे राजकीय नेतृत्व जसे बहरत जाईल, तसे त्यांना जिल्ह्यातच रोखण्याची तयारी झाली. त्यांचे शिष्य हसन मुश्रीफ त्यांचे प्रमुख विरोधक बनले. मंडलिक-मुश्रीफ यांचा राजकीय वाद विकोपाला गेला. ‘मी मोठं केलेलं भूत मीच गाडणार’ अशी गर्जना मंडलिक यांनी केली. शरद पवार जेव्हा अडचणीत असतील, तेव्हा निरपेक्ष वृत्तीने मंडलिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे पवार यांना मंडलिकांबरोबरचा मुश्रीफांचा वाद मिटविणे सहज शक्य होते. मात्र, तो मिटविण्याऐवजी मंडलिकांना खासदार असूनही पुढील निवडणुकीत तिकीट नाकारून ‘तुम्ही घरातच बसा,’ असा संदेश पवार यांनी दिला. स्वाभिमानी मंडलिकांनी वृद्धापकाळात प्रकृती साथ देत नसतानाही निवडणुकीच्या रिंगणात उतरून पवारांनाच धक्का दिला. उत्तरोत्तर पक्षाकडून मंडलिकांना उपेक्षित ठेवण्याचाच प्रयत्न झाला. त्याला आपल्याच जिल्ह्यातील राजकारणी कारणीभूत ठरले.खानविलकर स्थानिक राजकारणात अडकलेदिग्विजय खानविलकर हे एक सुशिक्षित राजकारणी. हिंदी, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असलेले नेते आणि केंद्रीय मंत्रिमंडळात काम करू शकेल असे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते; परंतु महादेवराव महाडिक यांच्याशी राजकीय मतभेदातून त्यांचा संघर्ष पेटला. नंतर महाडिक यांनी सतेज पाटील यांना पुढे करून खानविलकर यांचा काटा काढला. खानविलकर, महाडिक, सतेज पाटील यांच्यातील संघर्ष विशिष्ट निर्णायक वळणावर पोहोचल्यावर खानविलकर राजकारणातून बाजूला फेकले गेले.आवळे-आवाडे तोंडावर पडलेराजकारणातील अस्तित्व आणि सत्तेची खुर्ची कोणालाही स्वस्थ बसून देत नाही हेच खरे. हातकणंगले तालुक्यातील जयवंतराव आवळे विरुद्ध कल्लाप्पा आवाडे-प्रकाश आवाडे यांच्यातील वादही सर्वश्रुत आहे. दोघांचे मतदारसंघ वेगळे असूनही त्यांच्यात संघर्ष पेटला. मंत्रिपदाची खुर्ची मिळविण्यावरून हा संघर्ष पेटला. त्यामुळे २५ वर्षे राजकारणात असूनही दोघे साधे जिल्ह्याच्या राजकारणावर पकडही मिळवू शकले नाहीत. एकमेकांची जिरवण्याच्या नादात दोघांचीही जिरली. मोठी राजकीय क्षमता असलेले आवाडे पिता-पुत्र मागे राहिले. दोन्ही घराणी तोंडावर पडली.