कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीकरिता प्रभाग आरक्षण निश्चित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले असून, त्यांनी पहिल्या टप्प्यात प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची छानणी सुरू केली आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या इच्छुकांना फोनद्वारे संपर्क साधून आमच्या पक्षाकडून निवडणुकीला उभे राहा, असा आग्रह केला जाऊ लागला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या दोन-तीन महिन्यांत केव्हाही होऊ शकतात. सोमवारी प्रभागांवरील आरक्षण निश्चित झाल्यामुळे त्या त्या प्रभागात कोण, कोण कोण उभे राहणार याची उत्सुकताही आता संपत आली आहे. कारण सोमवारी दुपारनंतर अनेक प्रभागांत सर्वच इच्छुकांनी आपण निवडणूक लढविणार असल्याचे मतदारांना भेटून सांगितले. तसेच समाज माध्यमावरूनही उमेदवारी जाहीर करून टाकली. रात्री उशिरापर्यंत उमेदवार प्रभागात फिरून नागरिकांच्या गाठीभेटी घेताना पाहायला मिळाले. काहींनी बैठका घेऊन प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले. आपल्या आधी अन्य कोणी उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचू नये याची खबरदारी उमेदवार घेत होते.
काही प्रभागात उमेदवारांबाबत तडजोडी सुरू आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीतील चर्चा, आश्वासने यांना उजाळा दिला जात आहे. कोणी उभे राहायचे याचा निर्णय स्थानिक मंडळांच्या माध्यमातून, तसेच गल्ली, कॉलनीच्या माध्यमातूनही होणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत काही ठिकाणी तडजोडी होतात; पण बहुसंख्य ठिकाणी निवडणूक लढण्याच्या हव्यासापोटी या तडजोडी फिसकटतात, असे अनुभवसुद्धा येत आहेत.
काही राजकीय पक्षांनी आपल्याला फायद्याचे ठरतील असे उमेदवार हेरण्याचे काम सुरू केले आहे. हमखास निवडून येऊ शकतो, ज्याची प्रभागात चांगली प्रतिमा आहे, आर्थिक पाठबळ आहे अशा उमेदवारांच्या मागे काही ठिकाणी राजकीय पक्षाचे नेते लागल्याचे दिसते, तर काही भागात एका पेक्षा एक सरस उमेदवार असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला थांबवायचे हा गंभीर विषय सतावणार आहे. आरक्षणानंतर काहींनी फोनवर उमेदवारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. तुम्ही आमच्या पक्षाकडून उभे राहा, आम्ही पुढचे बघतो, असे निरोप दिले जात आहेत.
आप, भाजपची आघाडी
आम आदमी पार्टी यंदा प्रथमच मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरणार आहे. पक्षाचे प्रचार कार्यालय शिवाजी उद्यमनगरात सुुरू करून सोमवारपासून निवडणुकीची प्रत्यक्ष तयारी सुरू केली. प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी तयारीचा आढावा घेतला. त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप देसाई यांनी त्यांना सर्व माहिती दिली. पक्षातर्फे सर्व जागा लढविल्या जाणार असून, ६० जागांचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी रात्री बैठक पार पडली. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अजित ठाणेकर, विजय जाधव, विजयसिंह खाडे, अशोक देसाई यांच्यासह शहरातील सात मंडलचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. किमान ५५ जागांवर लढण्यास भाजपकडे उमेदवार असल्याचे सांगण्यात आले.