कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षवाढीपेक्षा ‘सोयीचे राजकारण’ सुरू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसत आहे. महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी नेत्यांनी आपल्या मतदारसंघांतील सोयीचे राजकारण पाहण्यास सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीअगोदर स्वबळावर दहा जागा लढविण्याची वल्गना जिल्ह्यातील नेत्यांनी केली पण प्रत्यक्षात आठ उमेदवार उभे करताना पक्षाची दमछाक उडाली. मागील पाच वर्षांत प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यात पक्षवाढीपेक्षा आपआपले मतदारसंघ सुरक्षित करण्याचे काम केल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाची पुरती धुळधाण उडाली. स्वत:ची जागा सुरक्षित करण्यासाठी करवीर व दक्षिण मतदारसंघात निवडणुकीआधीच तलवार म्यान केली आहे. दक्षिण मतदारसंघातील उरले-सुरले कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाल्याने येथे आगामी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत पक्षाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. करवीर व पन्हाळ्यात यापेक्षा वेगळी अवस्था नाही. करवीर व दक्षिणमध्ये उघड शिवसेना व भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीने स्वत:चेच खच्चीकरण केले. विधानसभा निवडणुकीनंतर तरी पक्षवाढीसाठी नेते प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती; पण आता कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. जिल्हास्तरीय मेळावा घेऊन त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. गेल्यावेळेला मित्रपक्षांना बरोबर घेत राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला फेस आणला होता. या निवडणुकीत काँग्रेसअंतर्गत बंडाळीचा फायदा उठवत पक्ष बळकटीची नामी संधी राष्ट्रवादीला होती; पण ठराव गोळा करतानाच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी हत्यार खाली ठेवल्याचे दिसते. रणजितसिंह पाटील यांना सत्तारूढ पॅनेलमध्ये घेत अरुंधती घाटगे यांना पॅनेलमधून वगळणे एवढाच अजेंठा आमदार हसन मुश्रीफ यांचा दिसत आहे. जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांनी या निवडणुकीबाबत ‘नरोवा कुंजरोवा’ अशीच भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील इतर प्रमुख कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)
सोयीच्या राजकारणाने ‘राष्ट्रवादी’ अस्वस्थ
By admin | Published: February 03, 2015 12:22 AM