कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठीकोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या दसरा चौकातील आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतानाच जिल्ह्यातील सहाही काँग्रेस आमदारांचे सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्येष्ठ आमदार पी. एन. पाटील, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव यांची उपस्थिती होती.सतेज पाटील म्हणाले, आत्ताच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या फार काही हाताला लागलेलं नाही. वास्तविक आजच्या या दिवसाची महाराष्ट्रातील मराठा जनता उत्सुकतेने वाट पहात असताना मंत्री उपसमितीच्या बैठकीत काहीच ठोस निर्णय झालेला नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक केंद्र शासनाकडे जावून याबाबत आवश्यक प्रक्रिया पार पाडण्याऐवजी महायुती शासन हा प्रश्न प्रलंबित ठेवण्याच्या मानसिकतेत आहे असे दिसते. गेले काही दिवस राज्यभर आंदोलन पेटले असताना काहीही ठोस जाहीर न करणे ही एक प्रकारची मराठा समाजाची फसवणूक आहे. या प्रश्र्नी राज्य सरकार शंभर टक्के अपयशी ठरले आहे.आमदार पी. एन. पाटील म्हणाले, विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये चर्चा करून निर्णय घ्यावा. केंद्र शासनाने घटनादुरूस्ती करून आरक्षणाबाबतचे अधिकार राज्याला द्यावेत. या सरकारची मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छा नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांचे राजकीय कार्यक्रम स्थगित, सतेज पाटील यांची माहिती
By समीर देशपांडे | Published: October 30, 2023 1:39 PM