कोल्हापूर : राजकारणात युती, आघाडी या नेहमीच होत असल्या तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता उपभोगणाऱ्या शिंदे गटाबरोबर राजकीय समझोता अशक्यच असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकातून दिली.संजय पवार म्हणाले, कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षीय जोडे बाजूला ठेवून जरी एकत्र पॅनेल करण्याचा प्रयत्न काही मंडळीनी केला असला तरी तो आम्हाला मान्य नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकसंधपणे सर्वच निवडणुकांना पुढे जाणे अपेक्षित होते. मात्र, दुर्दैवाने आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला विश्वासात न घेता परस्पर पॅनेल जाहीर केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. गृहीत धरून कोणी राजकारण करत असेल तर तेही आम्ही खपवून घेणार नाही.आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, अन्यायाविरोधात आमची लढाई नवीन नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी काही भूमिका घेण्याचा प्रयत्न केला असेल, मात्र त्यातून शिंदे गटाशी समझोत्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. प्रत्येक ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची अवहेलना करणाऱ्या शिंदे गटाला जवळही घेणार नाही. आगामी राजकारणातही एक वेळ घरी बसावे लागले तरी चालेल, मात्र अशा गद्दारांशी हातमिळवणी करणार नसल्याचे संजय पवार यांनी सांगितले.महाविकास आघाडीनेही सन्मानाची वागणूक द्यावी, कोल्हापुरातील सर्वच मतदारसंघांत निकाल बदलण्याची ताकद शिवसेनेत आहे, हेही आघाडीच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचे विकास संस्था गटातील सुरेश पोवार (सातार्डे) यांनी याच मुद्यावर माघार घेतली.
मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे, ज्यांनी ठाकरे कुटुंबीयांना त्रास दिला, त्यांच्यासोबत कदापि जाणार नाही. -सुरेश पोवार
पक्षविरहीत चांगले पॅनल तयार झाल्यानेच काहींची भाषा बदलली आहे. आयुष्यभर धनुष्यबाणाला विरोध करणारे, आम्हाला निष्ठा शिकवत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना उत्तर देऊ. - राजेश क्षीरसागर (कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ)