अशोक पाटील - इस्लामपूर -कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक घराण्याने एक वेगळाच ठसा उमटविला आहे. काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीचा समेट कोल्हापूरकरांच्या घरात दिसून आला. परंतु पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांच्या राजकीय वारसदारांनी आपली पक्षनिष्ठा वारणा नदीपात्रात बुडविली आहे. वेगवेगळ्या निवडणुकीतील त्यांच्या भूमिका पाहता, महाडिक बंधूंच्यात राजकीय अस्वस्थता असल्याचे स्पष्ट होत आहे. नुकतीच त्यांनी कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढील राजकीय वाटचालीची चर्चा केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.जिल्हा परिषद ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपर्यंत पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांचे पुत्र राहुल महाडिक आणि जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक हे भविष्यातील राजकीय दिशा ठरविण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. सध्या ते कोणत्या पक्षात आहेत, हेही स्पष्ट होत नाही. कोल्हापूर येथील त्यांच्याच घरातील बंधूंच्यात एक खासदार, दोन आमदार अशी पदे आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून पेठनाक्यावर आमदार पद येण्यासाठी महाडिक गट प्रयत्न करीत आहे. त्यात त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. काँग्रेसला रामराम ठोकून जिल्हा परिषद निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांच्या विकास आघाडीला साथ देत त्यांनी येलूर आणि पेठ येथील जिल्हा परिषद मतदार संघावर वर्चस्व मिळविले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रचारात सामील असल्याचा दिखावा केला. त्यांचे कार्यकर्ते मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारात सक्रिय होते. तसेच विधानसभा निवडणुकीत महाडिक गटाने राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याविरोधात शिवसेनेत जाऊन निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला, पण तोही फोल ठरला. जिल्हा बँक निवडणुकीत त्यांचे निकटवर्तीय मदन पाटील, भाजपचे संजय पाटील, शिवसेनेचे अनिल बाबर हेही आ. जयंत पाटील यांच्याबरोबर राहिल्याने महाडिक गट दुरावतच गेला. गटातील अस्वस्थता शिगेला पोहोचल्यानंतरच राहुल व सम्राट महाडिक यांनी कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गुफ्तगू केले. यावेळी काय चर्चा झाली, हे सांगण्यास त्यांनी नकार दर्शवला. जिल्ह्यातील राजकीय पक्षांची अवस्था बिकट आहे. सोयीप्रमाणे नेते पक्षाचा वापर करत आहेत. आमच्या गटातही अस्वस्थता आहे. महाडिक हाच वैयक्तिक पक्ष बनला आहे. भविष्यात सर्व विचार करुनच कोणत्या पक्षात जायचे, याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल.- सम्राट महाडिक, जिल्हा परिषद सदस्य
महाडिक गटामध्ये राजकीय अस्वस्थता
By admin | Published: May 25, 2015 12:05 AM