कोल्हापूर : भाजप नेते नारायण राणे यांनी त्यांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यानंतरच्या राजकारणाचा कोल्हापूरच्या ‘सीपीआर’ला फटका बसत आहे. सीपीआरमधील ३५ डॉक्टर्स तिसऱ्यांदा शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे येथील सीपीआरमधील गोरगरिबांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. शिवसेनेने सिंधुदुर्गमधील वैद्यकीय महाविद्यालय उभारून राणे यांना शह देण्याचा प्रयत्न चालविला आहे परंतु त्यात प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण भरडले जात आहेत. शिवसेनेच्या इर्षेच्या राजकारणात सीपीआरच्या वाट्याला मरण यातना येत आहेत.
याचवर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्याआधीच प्रत्येक जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या न्यायाने सिंधुदुर्ग येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले. राणे यांनी त्याआधीच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टरांशी करार करून त्यांची वैद्यकीय परिषदेकडून तपासणी करून घेऊन काम सुरूही केले.
त्यामुळे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारे डॉक्टर्स उपलब्ध होण्यात उशीर झाला. परिणामी राष्ट्रीय वैद्यकीय तपासणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील ३५ डॉक्टर्सना एका आदेशान्वये १० ऑक्टोबरला सिंधुदुर्गला पाठविण्यात आले. कागदोपत्री या सर्वांच्या बदल्या दाखवण्यात आल्या; परंतु त्यावेळी केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे पथक न आल्याने हे सर्वजण चार दिवस तिकडे राहून परत आले.
त्यानंतर पुन्हा समितीचा दौरा लागला आणि मध्यंतरी एकदा पुन्हा चार दिवसांसाठी सर्वांना सिंधुदुर्गला पाठवण्यात आले. समिती येवून गेली आणि त्यांनी काही तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने यंदा या महाविद्यालयाला अध्यापनास परवानगी देता येणार नसल्याचे वैद्यकीय परिषदेने स्पष्ट केले परंतु तरीही खासदार विनायक राऊत हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा तपासणी लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा सीपीआरच्या डॉक्टरांची चार, पाच दिवसांसाठी कोकणात रवानगी करण्यात आली आहे.
१२ पैकी १० भूलतज्ज्ञ कोकणात
सीपीआरमधील १२ पैकी १० भूलतज्ज्ञ कोकणात गेले आहेत. उर्वरित दोनपैकी एक महिला डॉक्टरही रजेवर गेल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोल्हापूरसह कोकणातील रुग्णांच्या सीपीआरमध्ये ठरविण्यात आलेल्या रोजच्या ३०-३५ शस्त्रक्रियाही खोळंबल्या आहेत. सीपीआरमध्ये सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने त्यांची मोठी कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर रुग्णांना तारखा देतात आणि नेमके त्याच्या आदल्यादिवशी त्यांना सिंधूदुर्गला जावे लागत असल्याने रुग्णांचे हेलपाटे सुरू आहेत.
महाविकास आघाडी... बोलणार कोण
एरवी सीपीआरच्या प्रश्नावर आंदोलने करणारे अनेकजण आहेत; परंतु महाविकास आघाडी म्हणून एकत्र राजकारण सुरू असल्याने कोल्हापुरात दोन्ही काँग्रेसलाही प्रश्न माहिती असून तोंड उघडता येईना अशी अवस्था झाली आहे.
शिवसेनेचा आग्रह
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. कायमस्वरूपी डॉक्टर्स आणि कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे तुम्ही २०२२/२३ च्या वर्षासाठी अर्ज करा असे स्पष्टपणे राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने कळवूनही नारायण राणेंशी इर्षा करताना शिवसेना कोल्हापूरच्या सीपाआरचे वाटोळे करायला निघाली आहे अशी चर्चा आहे.