राजाराम कांबळे- मलकापूर --जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पक्षाचे राजकारण चालत असले तरी शाहूवाडी तालुक्यात गटातटाचे राजकारण चालते. तसेच पक्षाचे लेबल नेत्यांच्या खिशाला लावले जाते. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची चाहूल सर्वच राजकीय गटांना लागली आहे. मलकापूर नगरपालिकेत सध्या शाहूवाडीचे मानसिंगराव गायकवाड व वारणा उद्योग समूहाचे नेते विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची घौडदोड सुरू आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी व जनसुराज्य आघाडी वेगळी चूल मांडण्याची शक्यता आहे.सध्या नगरपालिकेत राष्ट्रवादी व जनसुराज्य आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे आघाडीप्रमुख उदय साखरचे संचालक प्रकाश पाटील, जनसुराज्य पक्षाचे आघाडीप्रमुख जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर काम करीत आहेत. सेनेचे आमदार सत्यजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच नगरसेवक विरोधी भूमिका बजावत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून नगरसेवक सुधाकर पाटील काम पाहत आहेत. या दोन्ही आघाडींनी शहरात विकासकामांचा मोठा धडाका लावला आहे. वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार सत्यजित पाटील यांना निवडणुकीत मानसिंगराव गायकवाड यांनी मदत केली व सत्यजित पाटील आमदार झाले. थोड्या मताने विनय कोरे यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिवाला लागला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विनय कोरे यांनी सर्जेराव पाटील यांना निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून मानसिंगराव गायकवाड यांचा पराभव करून आमदारकीचे उट्टे काढले. मात्र, याचा परिणाम मलकापूर पालिका राजकारणावर झालेला नाही.विधान परिषदेच्या निवडणुकीत पालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली व येथूनच खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली. जनसुराज्य पक्षाचे उपनगराध्यक्ष अमोल केसरकर व नगरसेवक भगवान सपाटे विरोधी तंबूत दाखल झाले. मात्र, मलकापूर पालिकेचे सर्वांत जास्त मतदान माजी आमदार महादेवराव महाडिक यांना झाले. राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पालिकेच्या राजकारणात दोस्ती वाढविली. अंतर्गत कुरबुरी सुरू आहेत. निवडणुकीपूर्वी कोणत्याच पक्षाला भांडणे नको आहेत. आगामी निवडणुकीच्या जेवणावळी सुरू आहेत. सध्या तरी राष्ट्रवादी, जनसुराज्य व सेनेचे नगरसेवक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य व काँग्रेस अशी आघाडी होण्याची चिन्हे आहेत. सर्वच राजकीय पक्ष व गटांच्या प्रमुखांनी निवडणुकीची तयारी चालविली आहे. मात्र, जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आमदार सत्यजित पाटील, मानसिंगराव गायकवाड, विनय कोरे, करणसिंह गायकवाड, जिल्ह बँकेचे संचालक सर्जेराव पाटील, ‘उदय’चे संचालक प्रकाश पाटील यांच्या इशाऱ्यावर पालिकेच्या राजकारणांची तालीम रंगणार आहे. पालिकेच्या घरफाळा, पाणीपट्टी, वसुलीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला आहे.
गटातटाच्या राजकारणाने पक्षाचे लेबल नेत्यांच्या खिशाला
By admin | Published: June 03, 2016 1:10 AM