कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी शुक्रवारी चार ठराव सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयाकडे सादर झाले. यामध्ये करवीर, हातकणंगलेमधील प्रत्येकी एक, तर शिरोळमधील दोन संस्थांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल प्रकाश आवाडे यांच्या नावे श्रीकृष्ण सहकारी दूध संस्था, इचलकरंजी संस्थेचा ठराव दाखल झाला.‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. २३)पासून संघाशी ३६५९ प्राथमिक दूध संस्था सभासद असून, प्रारूप यादी तयार करण्यासाठी प्रतिनिधींच्या नावाचे ठराव मागविले आहेत. सोमवारी व मंगळवारी प्रत्येकी एकच ठराव निबंधक कार्यालयाकडे दाखल झाला होता. बुधवारी (दि. २५) सुट्टी होती, गुरुवारी ७ ठराव दाखल झाले. शुक्रवारपासून गर्दी होईल, असा अंदाज होता; मात्र केवळ चारच ठराव दाखल झाले. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या नावाने एक दाखल झाला आहे.संस्थांच्या पातळीवर ठराव करण्याचे काम सुरू असले, तरी ते ठराव त्या त्या तालुक्यांतील संचालकांकडे जमा केले जात आहेत. प्रत्येक संचालकाने ठराव करून घेण्यापासून आपल्याकडे घेण्यापर्यंत यंत्रणा सतर्क ठेवली आहे. ठरावांच्या संख्येवरच उमेदवारीचे भवितव्य असल्याने प्रत्येकाने ठरावासाठी कंबर कसली आहे. ठराव दाखल करण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदत असली, तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संचालक एकगठ्ठा ठराव नेत्यांकडे जमा करतील. त्यानंतर ते सहायक निबंधक कार्यालयाकडे दिले जातील.शुक्रवारी दाखल झालेले ठराव असे -संस्था तालुका ठरावधारक
- यशवंत, येवती करवीर मिलनसिंह आबासो पाटील
- श्री कृष्ण, इचलकरंजी हातकणंगले राहुल प्रकाश आवाडे
- हनुमान, मौजे आगर-कांबर्डेे शिरोळ रंगराव तुकाराम नारिंगकर
- दत्त, हरोली शिरोळ शांतीनाथ बाबासो पाटील