कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीबाबत ‘चारा वीट प्रकल्पा’च्या कार्यक्रमात संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी मौनच पाळले. उलट महाडिक यांनी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या कामाची प्रशंसा केल्याने इच्छुकांची गोची झाली आहे.विश्वास पाटील हे गेली साडेतीन वर्षे ‘गोकुळ’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ज्येष्ठ संचालकांनी दोन वेळा महाडिक यांची भेट घेऊन बदलण्याची पुन्हा मागणी केली. ७ डिसेंबरला ‘गोकुळ’च्या चारा वीट प्रकल्पाचे उद्घाटन आहे. ते झाल्यानंतर १४ डिसेंबर रोजी आपण व पी. एन. पाटील बसून काय तो निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी संचालकांना दिले.
चारा वीट प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १४) झाल्यानंतर अध्यक्ष बदलाबाबत इच्छुकांमध्ये जोरदार खलबते सुरू झाली आहेत; पण याच कार्यक्रमात महाडिक यांनी ‘पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये अध्यक्ष पाटील यांनी मान्यतेपेक्षा जादा जागा घेऊन संघाचा कोट्यवधी रुपयांचा फायदा अध्यक्ष पाटील यांनी करून दिल्या’चे प्रशंसोद्गार काढले. यामुळे एरव्ही कोणत्याही हास्यविनोदात रमत असलेल्या संचालकांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता.
पाटील यांना बदलणे अशक्य कसे?अध्यक्ष पाटील हे करवीर विधानसभा मतदारसंघातील आहेत; त्यामुळे विधानसभा निवडणूक होईपर्यंत त्यांच्याकडेच अध्यक्षपद राहावे, यासाठी पी. एन. पाटील आग्रही राहू शकतात. तालुक्याच्या राजकारणात ते नरके गटाचे विरोधक आहेत, हीदेखील त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे पी. एन. यांचा पहिला प्रयत्न अध्यक्षबदल विधानसभा निवडणुकीनंतरच करू, असाच राहील.
...तर डोंगळे, रणजितसिंह, अंबरीश यांची शक्यताअध्यक्षबदलाबाबत संचालकांनी फारच आग्रह धरला तर अरुण डोंगळे व रणजित पाटील यांचा विचार होऊ शकतो. डोंगळे आक्रमक आहेत. ‘भोगावती’त ते पी. एन. पाटील यांच्यासोबतआहेत. डोंगळे यांच्या नावास महाडिक कितपत तयार होतात, हे महत्त्वाचे आहे. रणजित पाटील हेदेखील प्रबळ दावेदार आहेत. ते दोन्ही घाटगे गटांना चालू शकतात. आगामी लोकसभा निवडणुकीत बेरजेचे राजकारण करून कागल तालुक्यातून मदत मिळावी, यासाठी दोन्ही घाटगे गटांत समझोता घडवून आणण्यासाठी महाडिक प्रयत्नशील आहेत. त्याचा भाग म्हणून अंबरीश घाटगे यांना ‘गोकुळ’मध्ये संधी देऊन समरजित घाटगे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा केला जाण्याचीही एक शक्यता आहे.
बदल करायचा की नाही याचा कोणताही निर्णय या क्षणाला आम्ही घेतलेला नाही. मी व पी. एन. पाटील १४ तारखेला एकत्र बसू व त्यानंतरच याचा निर्णय होईल. युद्धाला सामोरे गेल्यावर समोरच्याला गोळी घालायची की तेथून पळून यायचे हे त्यावेळी ठरवायचे, अशी महाडिक यांची कार्यपद्धती आहे.- महादेवराव महाडिक, नेते, गोकुळ